जळगाव (प्रतिनिधी) दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव या विद्यालयात जळगाव शहर महानगरपालिका व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थांसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जनसंपर्क अधिकारी वर्मा मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एस. पाटील, पर्यवेक्षक डी.बी. सोनवणे व कनिष्ठ विभाग प्रमुख गजेंद्र पाटील उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. प्रथम लस घेणाऱ्या विद्यार्थिनींचे स्वागत मान्यवरांनी पुष्प देवून केले. या लसीकरणाचा विद्यालयातील सुमारे १९२ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील व रेडक्रॉस सोसायटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.व्ही. पाटील यांनी केले. तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.बी. सोनवणे यांनी मानले.