धरणगाव (प्रतिनिधी) आभासी सामाजिक माध्यमातून एकत्र आलेल्या, कुबेर फेसबुक समुहाने, महाराष्ट्रात सामाजिक कार्यात एक नवी चळवळ उभी केली आहे. फेसबुक समुहाद्वारे प्रकाशीत होणारा, कुबेर दिवाळी अंक हा एकमेव असावा, असे गौरवोद्गार लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी काढले. कुबेरने वाचन चळवळ वृध्दींगत करण्यात महत्वाची भुमिका निभावली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ते कुबेर दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खान्देशातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा कुबेरचे जिल्हा समन्वयक प्रा.बी.एन.चौधरी होते.
पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर येथील न.पा.सभागृहात नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते, कुबेर दिवाळी अंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. अंकाने चार वर्षात गुणवत्तेचे १६ पुरस्कार मिळविल्याबद्दल त्यांनी समुह प्रमुख संतोष लहामगे यांचे अभिनंदन केले. या समुहामार्फत होणाऱ्या संमेलनांबद्दल त्यांनी कौतुक करुन, धरणगाव नगरीत कुबेरचे विभागीय संमेलन घ्यावे, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी लोकनियुक्त नगराध्यक्षांचा परिचय करुन देतांना, त्यांची साहित्य, कला, सामाजिक क्षेत्राची जाण आणि जिनिंग क्षेत्रातील उदयन्मोख उद्योजक असल्याचा परिचय डी.एस.पाटील यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्तविकातून कुबेर समुहामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विजय वाघमारे यांनी करुन दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. बी.एन.चौधरी यांनी मराठी माणसांच्या मनात दिवाळी अंकांनी मिळवलेले स्थान, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली. कुबेर दिवाळी अंकात मान्यवर साहित्यिकांसोबत नवोदीतांनाही व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते, याचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. संतोष लहामगे व संपादक डॉ. अभिजित कदम यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी अंकाची निर्मिती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविली जात असल्याचे ते म्हणाले. साहित्य निष्पक्ष निवड समितीकडून निवडले जाते, असे त्यांनी सांगितले.
यावर्षी अंकात १८ कथा, २२ लेख, २ मुलाखती, २ प्रवासवर्णन, ४३ कविता, काही पाककृती आणि व्यंगचित्र असा भरगच्च-समृद्ध मजकूर आहे. यासाठी महाराष्ट्रातून ५०० वर लेखक, कवींनी विक्रमी साहित्य पाठविले होते. कार्यक्रमात कुबेरच्या सदस्या हेमलता पाटील यांनी कुबेर समुहातील महिलांचा विशेष सहभागाबद्दल आणि महिला उपक्रमाबाबत आपले मनोगत मांडले.
सूत्रसंचालन अरविंद चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन डी. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जळगाव विभाग समन्वयक निलेश भांडारकर, रेखा पाटील, संजय सपकाळे, कल्पेश पाटील, अमोल चौधरी, लोकेश चौधरी, भोजराज चौधरीसह सर्व कुबेर सदस्यांनी परीश्रम घेतले.