नांदेड ता. धरणगाव (दीपक भोई) नांदेड गावाच्या परिसरात मागील काही दिवसापासून हिंस्त्र प्राण्याकडून जनावरांचा फडशा पाडण्याचा थरार सुरुच आहे. साधारण चार दिवसांपूर्वी ३ जनावरांचा फडशा पाडल्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा वासरूचा फडशा पडल्याचे आढळून आल्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात जनावरांची शिकार करण्याचे काम बिबट्याच करत असल्याची भीती शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.
नांदेड गावाजवळील घुरखेडा शिवारात आतापर्यंत शेतकऱ्यांची ५ गुरंढोरांचा अज्ञात हिंस्त्र प्राण्याने फडशा पडल्याचे आढळून आले आहे. सर्वात आधी देविदास कोळी, जनार्धन गोसावी आणि सतिश कोळी या तीन शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा या हल्ल्यात जीव गेला होता. त्यावेळी घटनास्थळी बिबट्याच्या पायाच्या पंजाशी मिळते-जुळते ठसे देखील आढळून आले होते. आता ज्ञानेश्वर गयभू कोळी यांच्या गायीच्या वासरावर हल्ला करून या प्राण्याने फडशा पाडला आहे. या आधी घटनास्थळावर मिळून आलेल्या पावलांच्या ठशांवरून ते ठसे बिबट्याचेच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु वन विभागाकडून त्या हिंस्र प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी अद्यापही काही उपाययोजना केली गेली नाहीय. त्यामुळे परिसरात भविष्यात माणसांवर सुद्धा हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे. बिबट्या असल्याचे भीतीने मजूर शेतात कामाला जात नाहीय.
धरणगाव तालुक्यात याआधी साधारण चार वर्षापूर्वी जांभोरे शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्या होत्या. गावातील बापू लाला बडगुजर यांच्या शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी मजूर राहूल ठाकूर गेला होता. त्यावेळी त्याला बिबट्या शेळी खाताना दिसला होता. तर मागील वर्षी निंभोरा गावाच्या पूर्वेस चोरगाव रस्त्यालगत शरद जनार्दन कोळी यांच्या शेतातील गोठ्यात बिबट्याने गाईचे वासरूचा फडशा पाडला होता.
















