पाळधी ता. धरणगाव (शाहबाज देशपांडे) येथील देशमुख परिवाराने मशिदीत आज सर्वधर्मीय शिरखुरमा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गावातील एकोपा असाच राहू द्या, असे प्रतिपादन केले.
माजी सरपंच आलीम देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण देशमुख परिवारातर्फे दर वर्षी ईद निमीत्त सर्व धर्मिय शिरखुर्माचे आयोजन करण्यात येते. हा कार्यक्रम त्यांचे वाड्यात साजरा होतो. मात्र, या वर्षी त्यांनी आपल्या मशिदीत या कार्यक्रमाचे आयोजन करून एक प्रकारचा सुखद धक्का देवून सध्या सूरू असलेल्या वातावरणात एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न याद्वारे केल्याने ‘हम सब एक है’ चा नारा या व्दारे देण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मागील सर्व घटना विसरून आपण सर्व धर्मीय सण कसे एक होवून साजरा करतो हे दाखवून दिल्याचे सांगितले. तर देशात काहीही घडो मात्र आपले गावात काही अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. या वेळी माजी सभापति मुकुंदराव नन्नवरे, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, माजी सरपंच आलीम देशमुख,जुबेर देशमुख, डॉ. राजू देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले.
सध्या राज्यात सुरू असलेल्या वातावरणात देशमुख परिवाराने हा कार्यक्रम मशिदीत साजरा करुन जगाला एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्फेज देशमुख यांनी सुरेख पणे करुन उपस्थितांची मने जिंकली.