जळगाव प्रतिनिधी – मानवी जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी महात्मा गांधींसह अनेक महापुरुषांनी निवडलेला सामाजिक परिवर्तनाचा वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आजच्या तरुणांची आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्पमध्ये देशभरातून आलेल्या तरुणांनी हा वारसा समृद्ध करावा अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या माजी कुलगुरु व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केली.
वाकोद येथील गौराई कृषी फार्म येथे आजपासून सुरु झालेल्या नॅशनल गांधीयन लीडरशिपच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अयंगार, रिसर्च डीन डॉ. गीता धर्मपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, प्राचार्य देवेंद्र चौधरी, समन्वयक उदय महाजन व अकॅडेमिक डीन डॉ. अश्विन झाला उपस्थित होते.
आपल्या मनोगतात डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या आपल्याला पडणारे प्रश्न आपण खुलेपणाने विचारले पाहिजे, चिंतन केले पाहिजे. आजच्या पिढीला आवश्यक असलेला संयम, श्रद्धा, आसक्ती या गोष्टी गांधीजींच्या जीवनातून शिकायला मिळतील. तंत्रज्ञानाच्या नवनवीन अविष्कारांना स्वीकारतांना योग्य नियंत्रण हवे. शाश्वत विकासाचा विचार करतांना आपण योग्य गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे व त्याच समाजापर्यंत पोहोचतील. प्लास्टिकचा वापर, श्रम प्रतिष्ठा यासारख्या गोष्टी आपल्या जीवनाला आकार देतील व त्यातूनच आदर्श व्यक्तिमत्वे घडतील असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत विविध प्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. क्षेत्र अधिकारी प्रशांत चौधरी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी साबरमती के संत तुने कर दिया कमाल हे गीत सादर केले. डॉ. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविकातून अशा प्रकारच्या शिबिरांची आवश्यकता व त्यामागील गांधी रिसर्च फाऊंडेशनची भूमिका मांडली. अब्दुलभाईंनी विद्यार्थ्यांना शिबिरातील सहभागीकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या.
अध्यक्षीय समारोपात डॉ. सुदर्शन अयंगार यांनी हे शिबीर ग्रामीण भागात करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. या शिबिरात आपण युवा गांधीजींना समजून घेणार आहोत. ज्यांनी आपल्या जीवनात समाज परिवर्तनाचे कार्य करीत संपूर्ण देशाला एकत्रित बांधून स्वतंत्रता आंदोलनात प्रमुख भूमिका बजावली. डॉ. अश्विन झाला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर दीपक मिश्रा यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
शिबिरात १६ राज्यातील ५४ युवक-युवतींचा सहभाग आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व शिबिरार्थींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. दि. ९ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात विविध सत्रांसह, श्रमदान, जनजागृती आदी कार्यक्रम होणार आहे. तसेच अजिंठा व जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांना भेट देण्यात येणार आहे.
 
	    	
 















