जळगाव (प्रतिनिधी) ‘शासन आपल्या दारी’ या अंतर्गत झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी रेशनकार्डधारकांना उपस्थित राहण्याची सक्तीचे व्हाटस्अप मॅसेज झाले होते. हे मॅसेज शिंदे गटाचेच रेशन दुकानदार असलेले नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पाठवल्याचे स्पष्ट झाले. यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द केला आहे.
याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. त्यात म्हटलेय की, स्वस्त धान्य दुकानदार यांनी “शासन आपल्या दारी” या शासकीय कार्यक्रमाच्या नावाखाली व्हॉट्सअप ग्रुप वर दि. 27/06/2023 रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यक्रमास सर्व कार्डधारकांना हजर राहणे बंधनकारक आहे व जे रेशन कार्डधारक या कार्यक्रमास हजर राहणार नाहीत त्या कार्डधारकांचे धान्य तीन ते चार महिने बंद करण्यात येईल असा धमकी वजा इशारा दिलेला होता.
सदर कार्यकमास सर्व रेशनकार्ड धारकांनी हजर राहणे बंधनकारक आहे असा शासन निर्णय असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार यांचे कडुन व्हॉट्सअॅप मेसेज टाकण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमात कार्डधारकांना महत्वाच्या सुचना देणार आहेत व तेथे कार्डधारकांची सर्वांची नोंद घेतली जाईल त्यामुळे सर्व ग्राहकांनी हजर राहणे अनिवार्य आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या नावाखाली व्हॉट्सअप ग्रुप वर लाभार्थ्यांमध्ये दिशाभूल निर्माण करणारे मेसेज टाकलेले आहे.
शासनाची प्रतिमा झाली मलीन झाल्याचे आदेश नमूद
स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना वेळेवर धान्य देत नसले बाबत यापूर्वी देखील तक्रारी आहेत. लाभार्थ्यांना धान्य न देता धान्याचा काळाबाजार करण्याचा प्रकार सूरू आहे. याप्रकरणाची वस्तुस्थिती असून, सदर तक्रारीच्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानदार यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लाभार्थ्यांना सामाजिक माध्यमांमध्ये चुकीचे दिशाभूल करणारे संदेश दिले आहेत. यामुळे वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडीया अशा विविध माध्यमातून शासनाची प्रतिमा मलीन झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सादर कार्यक्रमास लाभार्थ्यांना उपस्थितीबाबत अनिवार्य असणे याबाबत शासनाचे क्षेत्रीय अधिका-यांनी कोणतेही निर्देश दिलेले नसतांना संबंधित रास्त भाव दुकानदार यांनी स्वतः याबाबत सामाजिक माध्यमाद्वारे प्रसिद्धी देणे ही बाब त्यांना सोपविलेली कर्तव्य व जबाबदारी याविरूध्द असल्याने ती गंभीर स्वरूपाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार नवनाथ विश्वनाथ दारकुंडे (स्वस्त धान्य दुकान क्र. 9 वार्ड क्रमांक 2/1 शिवाजी नगर, ता. जि. जळगाव) यांनी शासनाचे प्रति दायित्व व महाराष्ट्र अनुसुचित वस्तु वितरणाचे विनियमन आदेश, 1975 मधील तरतुदींचा तसेच प्राधिकारपत्रातील अटी व शर्तीचा भंग केला आहे.
नेमकं काय म्हटलंय आदेशात !
स्वस्त धान्य दुकानदार नवनाथ दारकुंडे या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र या आदेशाच्या दिनांकापासून पुढील आदेशापावेतो निलंबीत करण्यात येत आहे. उक्त निलंबित करणेत आलेले स्वस्त धान्य दुकान व सदर दुकानास तात्पुरत्या स्वरुपात जोडण्यात आलेली इतर स्वस्त धान्य दुकाने शासन निर्णयान्वये नजिकच्या स्वस्त धान्य दुकानास ( सदर दुकानदाराचे नातेवाईक वा त्यांचे संलग्न इतर संस्थेस वगळून ) तहसिलदार, जळगाव यांनी तात्काळ जोडावे व त्याबाबतचा अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा. तहसिलदार, जळगांव यांनी सदर तक्रार व स्वस्त धान्य दुकानाची फेरतपासणी करावी. D1 व eDl याचा ताळमेळ घेण्यात यावा. त्याबाबत वस्तूनिष्ठ, परिपुर्ण, स्वंयस्पष्ट अभिप्रायासह अहवाल या कार्यालयास सादर करण्याचे म्हटले आहे.