धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील सोनवद रस्त्यावर असलेल्या पालिकेच्या व्यापारी संकूलासमोर आज पुंडलिक महिपत माळी या ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नव्वदच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येणारा पुंडलिक माळी हा जिल्ह्यातील पहिला सामान्य शिवसैनिक होता.
यासंदर्भात अधिक असे की, कुशल वाहन चालक, कारागिर अशी ओळख असलेला पुंडलिक माळी हा कडवा शिवसैनिक होता. तेव्हाच्या एरंडोल तालुक्यातील शिवसेनेच्या जळणघळणीत पुंडलिक माळी यांचे मोठे योगदान होते. व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे जिवन उध्दवस्त झाले. मात्र, त्यांच्या खांद्यावर भगवा रूमाल कायम रहायचा. याच भगव्या रूमालाचा फास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स जवळ निंबाचे झाडाला अडकवून आज पहाटे ४ वाजता पुंडलिक माळी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती समजताच चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले. पुंडलिक पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार आहे.