पुणे (वृत्तसंस्था) नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या कारवायांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक व समीर वानखेडे यांच्यात सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट नकार दिला आहे. इतरांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देण्यास मी बांधील नाही. मला तेवढाच उद्योग नाही. इतरही भरपूर कामं आहेत, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले आहे.
माध्यमांनी अजित पवारांना वानखेडे आणि मलिक यांच्याविषयी प्रश्न विचारला. यावेळी उत्तर देताना पवार म्हणाले की, ‘एक मिनिट… मला याविषयी काहीच विचारू नका. नवाब मलिकांचे प्रश्न हे त्यांना विचारा. समीरचे प्रश्न समीर यांना विचारा. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मी येथे आलेलो नाही. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विद्यापीठ पुलाविषयी बोलण्यासाठी मी येथे आलो आहे. इतरांनी काही केलं आणि ते असं म्हटले यावर उत्तरे द्यायला मी बांधिल नाही’ तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले की, ‘जसा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे ना, तसा मलाही नो कॉमेंट म्हणायचा अधिकार आहे.’