बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील मानमोडी ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेतील अपहार प्रकरणी माजी सरपंच सतीश ज्ञानेश्वर पाटील आणि सचिव प्राजक्ता प्रशांत पाटील यांच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ता पाटील, ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत उर्फ आबा पाटील यांच्या पत्नी आहेत, यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात विद्यमान सरपंच पूनम मोहन पाटील यांनी पाठपुरावा करून देखील कारवाई न झाल्याने आमरण उपोषण केले होते. महिला सरपंचाच्या उपोषणामुळे तालुक्यातील लोकांचे लक्ष या प्रकरणावर लागले होते. उपोषणाला मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली, आणि त्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली.
आज सकाळी १० वाजेपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली, आणि दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. उपअभियंता तायडे यांच्या फिर्यादीनुसार, २०१६ मध्ये मानमोडी ग्रामपंचायतीमध्ये ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये सतीश पाटील अध्यक्ष होते, तर प्राजक्ता पाटील सचिव होत्या, आणि इतर ९ सदस्य कार्यरत होते.
सदर समितीला पाणीपुरवठा योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे आणि शासकीय निधी खर्च करण्याचे अधिकार होते. योजनेची प्रशासकीय मान्यता १४०२३६८ रुपयांवर होती, तर तांत्रिक मान्यता १४०२३७० रुपयांवर होती. योजनेच्या कार्यान्वयनासाठी संबंधित खातं बोदवड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियात सुरू करण्यात आले होते. आता, या प्रकरणात मानमोडी ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन योजनेतील अपहाराचा तपास सुरू आहे.
मानमोडी ग्रामपंचायतीच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधीच्या वितरणात अनियमितता आढळली आहे. योजनेअंतर्गत निधीचा पहिला हफ्ता दि. 19/01/2017 रोजी रु. 3,62,279/- इतका वितरित करण्यात आला होता, ज्याची रक्कम दि. 20/01/2017 रोजी कंत्राटदार श्री. ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यानंतर, दि. 18/08/2017 ते 17/11/2017 या कालावधीत तत्कालीन शाखा अभियंता श्री. विवेक गोविंदराव पाटील आणि उपअभियंता श्री. भास्करराव चिंधु पाटील यांनी कामाचे मुल्यांकन करून रु. 3,79,525/- इतकी रक्कम काम झाल्याचे मोजमाप पुस्तिकेत नोंदवली होती. हे मुल्यांकन अहवाल 01/03/2018 रोजी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना सादर केले होते.
दुसऱ्या व तिसऱ्या हफ्त्याचे वितरण दि. 26/03/2018 रोजी रु. 8,41,422/- इतके करण्यात आले. मात्र, या निधीसाठी कोणतेही मुल्यांकन झाल्याचे दिसून आले नाही. समितीमार्फत दि. 03/04/2018 रोजी रु. 3,50,000/- आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि. 03/04/2018 रोजी आणखी रु. 3,50,000/- इतकी रक्कम कंत्राटदार श्री. ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. तसेच, दि. 05/04/2018 रोजी रु. 1,42,230/- रक्कम न्यू दीपक हार्डवेअर, बोदवड यांच्या बँक खात्यात जमा केली गेली. एकूण रक्कम रु. 8,42,230/- इतकी वितरित झाल्याचे दिसून येते. मात्र, हे सर्व वितरण मुल्यांकन झाल्यानंतरच करणे अपेक्षित होते. क्कम खर्च करणेसाठी मोजमाप पुस्तिकेत झालेल्या कामांच्या नोंदी सक्षम प्राधिकारीकडुन न घेता रक्कम खर्च केल्याचे निदर्शनास आले आहे.
योजनेच्या कामाची मुळ मुदतीत पूर्णता झालेली नाही. उंच जलकुंभाचे आरसीसी काम वगळता इतर कोणतेही काम मुळ मुदतीत पूर्ण झालेले नाही. उर्वरित काम जानेवारी 2025 मध्ये केले गेले आहे. या कामाचे मुल्यांकन उपअभियंता श्री. विशाल बाबुराव तायडे आणि कार्यकारी अभियंता श्री. गणेश भोगावले यांनी केले असून, त्या नुसार आजपावेतो कामाचे एकूण मुल्यांकन रु. 9,28,587/- इतके झाले आहे.
तर, योजनेच्या अंतर्गत वितरित एकूण रक्कम रु. 12,03,701/- इतकी होती. यामध्ये दोन्ही रक्कमांमधील फरक रु. 2,75,114/- इतका आहे. योजनेच्या बँक खात्यात (खाता क्र. 3586795236) दि. 05/04/2018 रोजी बँक स्टेटमेंटनुसार फक्त रु. 2,731/- इतकी रक्कम शिल्लक होती, म्हणजेच रु. 2,72,383/- रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट होते.
मानमोडी ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने शासकीय निधी रु. 12,03,701/- वितरित केले असताना, समितीच्या अध्यक्ष श्री. सतीश ज्ञानेश्वर पाटील आणि सचिव श्रीमती प्राजक्ता प्रशांत पाटील यांनी फक्त रु. 9,28,587/- इतकेच काम पूर्ण केले आणि उर्वरित रक्कमाची अनियमितता आढळली. यावरून हे स्पष्ट होते की, समितीचे रक्कमेचे वितरण योग्यरीत्या झालेले नाही आणि त्यामध्ये रु. 2,72,383/- इतका अपहार झाला आहे. त्यामुळे, सदर अपहारीत रक्कमेसाठी श्री. सतीश ज्ञानेश्वर पाटील (अध्यक्ष) आणि श्रीमती प्राजक्ता प्रशांत पाटील (सचिव) यांना समान जबाबदार ठरवले गेले आहे. यावर भा.दं.सं. ४२०,४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पो.उ.नि. सुजित पाटील करीत आहेत.