मुंबई (प्रतिनिधी) अभिनेता सैफ अली खान यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री घडलेल्या चाकू हल्ल्याने खळबळ उडवली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हल्ल्यामागे एक कोटी रुपयांच्या खंडणीचा संभाव्य संबंध असल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री एक अनोळखी दरोडेखोर सैफ अली खान यांच्या घरात घुसला आणि चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान आणि त्यांचा एक मदतनीस जखमी झाले आहेत. दरम्यान, मदतनीसाने दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणातील गुंतागुंतीत अधिक भर पडली आहे. हा हल्ला केवळ चोरीसाठी करण्यात आला होता की त्यामागे आणखी काही कारण होते, याचा तपास पोलीस वेगाने करत आहेत. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्या रात्री नेमकं काय घडलं ?
वांद्रे पश्चिमेकडील सद्गुरू शरण इमारतीच्या ११ आणि १२ व्या मजल्यावर अभिनेता सैफ अली खान कुटुंबासोबत राहातो. विरार गार्डनमधील रहिवासी असलेल्या एलियामा फिलीप या सैफ अली खानकडे परिचारिका म्हणून काम करतात. त्या आणि आया जुनू या सैफ अली खान याचा छोटा मुलगा जहांगीर ऊर्फ जयबाबा याला सांभाळण्याचे काम करतात. तैमुरची देखभाल करण्याकरिता गीता नावाच्या परिचारिका आहेत. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एलियामा यांना जाग आली. बाथरूमजवळ डोक्यावर टोपी घातलेला अनोळखी व्यक्ती बसल्याचे त्यांना दिसले. एलियामा यांनी त्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न केला. ‘नो आवाज,’ असे तो हिंदीत बोलला. आया जुनू झोपेतून उठली. त्यावर त्याने ‘कोई आवाज नही और कोई बाहर भी नही जाएगा,’ असे बोलून धमकावले. एलियामा या जयबाबाला उचलण्यास गेल्या असता त्याने सोबत आणलेली लाकडी वस्तू आणि चाकूने वार केला.
वार हातावर लागून एलियामा जखमी झाल्या. एलियामा यांनी त्याला आपको क्या चाहिए, अशी विचारणा केली असता त्याने ‘पैसा चाहिए,’ असे उत्तर दिले. एलियामा यांनी ‘कितना चाहिए,’ अशी विचारणा केली असता त्याने वन करोड, असे उत्तर दिले. याचवेळी जुनू या आरडाओरड करत रूमच्या बाहेर गेल्या. आरडाओरड ऐकून सैफ अली खान हा आरोपीला विरोध करण्यासाठी पुढे सरसावला. सैफ अली खान आणि आरोपींमध्ये झटपट झाली. आरोपीने सोबत आणलेल्या एक्सोब्लेडने सैफवर हल्ला चढवला. त्याने सैफ अली खानवर सहा वार केले. सैफ अली खानला वाचवण्यासाठी गीता मध्ये धावली असता त्याने तिच्यावरही हल्ला केला. आरोपीने सहावा वार सैफच्या पाठीवर, मणक्यांमध्ये केला. यात खोल जखम होऊन चाकू तुटला. अखेर, हल्लेखोर आरोपीने तेथून पळ काढला. हल्ल्याच्या घटनेने सैफ अली खानच्या घरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्लेखोर कॅमेऱ्यात कैद
आरोपी पळून जाताना इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याआधारे स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची एकूण १५ पथके तयार करून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. हल्लेखोर सराईत गुन्हेगार असू शकतो. हल्लेखोराने डक्टच्या आतून घरात प्रवेश केला होता. तर हल्ला केल्यानंतर तो घराचे दार उघडून बाहेर गेल्याची माहिती आहे. ही घटना ज्या पद्धतीने घडली, त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही असेच गुन्हे दाखल झाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.
सैफची प्रकृती आता चांगली – डॉ. नीरज उत्तमानी
सैफ याला रात्री दोन वाजता रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या अंगावर एकूण ६ जखमा होत्या. त्यातील २ जखमा खोलवर असून, त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. लीलावती रुग्णालयाच्यावतीने न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी यांनी सांगितले की, सैफ याच्या पाठीत सुरा खुपसण्यात आला होता. त्याच्या मणक्याला इजा झाली आहे. त्याच्या पाठीतून सुऱ्याचे पाते बाहेर काढण्यात आले असून, मणक्यामधून होणाऱ्या स्पायनल फ्लुइडची गळती रोखण्यात शस्त्रक्रियेमुळे यश आले आहे. तसेच त्याच्या डाव्या हातावर दोन खोलवर वार झाले असून, त्याच्या मानेवरही वार झाल्याने तिथे प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. सैफची प्रकृती आता चांगली असून, त्याला कुठलाही धोका नाही.