जळगाव (प्रतिनिधी) मोहाडी कोव्हीड रुग्णालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणात आता शैक्षणिक अर्हता नसलेले कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितल्यानंतर देखील माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. वास्तविक बघता जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्र तपासणी करण्याचे शासन निर्देश आहेत. एवढेच नव्हे तर कामावर हजर करून घेण्याआधी उमेदवारांकडून छायांकित प्रती जमा करणे गरजेचे होते.
कामावर हजर करण्यापूर्वी शैक्षणिक कागदपत्र तपासणी करून छायांकित प्रती जमा करणे अपेक्षित
जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकिय अधिक्षक, यांनी पुरवठा करण्यात येणा-या मनुष्यबळांचे शैक्षणिक अर्हता व पात्रतेबाबत लेखी सहमती दर्शविल्यानंतर या सेवा प्रत्यक्षात घेण्यात येणार होती. शासन निर्णयात दर्शविलेल्या पदानुसार विविध कामासाठी पुरविण्यात येणाऱ्या मनुष्यबळाची शैक्षणिक अर्हता व अनुभव या सर्व बाबीची पडताळणी केल्यानंतरच या सेवा घेण्यात येतील, ही बाब सेवा पुरवठाधारकास बंधनकारक राहील असा देखील नियम आहे. अगदी कामावर हजर करण्यापूर्वी वैद्यकीय अधीक्षक यांनी उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्र तपासणी करून छायांकित प्रती जमा करणे अपेक्षित होते. परंतू याबाबतची माहिती देखील दिनेश भोळे यांना पुरवण्यात आलेली नाहीए. त्यामुळे शैक्षणिक अर्हता व अनुभव न बघता अगदी अल्पशिक्षित कर्मचारी लावण्यात आल्याचे उघड होत असल्याचे श्री. भोळे यांचे म्हणणे आहे.
भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रोमा केअर स्टेंटरमधून समोर आला गोंधळ
मोहाडी कोव्हीड रुग्णालय प्रमाणे एमव्हीजी कंपनीने भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रोमा केअर स्टेंटरमध्ये मनुष्यबळ पुरविण्याच्या ठेका घेतलेला होता. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी तेथे देखील माहिती अधिकारात कार्यरत मनुष्यबळाशी निगडीत विविध माहिती मागितली होती. त्यात प्रामुख्याने शिक्षणिक अर्हतेची माहिती मागितली होती. परंतू २४ ऑगस्ट २०२२ रोजी दिलेल्या पत्रात भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रोमा केअर स्टेंटरचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले की, सदचे दस्तऐवज संबंधित कंपनीकडून मागून घ्यावेत. ग्रामीण रुग्णालय भुसावळकडे याबाबतची माहिती अप्राप्त आहे. वास्तविक बघता ८ डिसेंबर २०२१ रोजी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भुसावळ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना पाठवलेल्या पत्रात उमेदवारांची शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करून छायांकित प्रती जमा करून घेण्याचे यावे, असे आदेश दिले होते. त्यामुळे भुसावळ ग्रामीण रूग्णालयाकडे माहिती उपलब्ध नसणे, हा मोठा गंभीर विषय असल्याचे श्री. भोळे यांनी म्हटले आहे.