मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच प्रतीक गाभा आणि ऋषभ सचदेवने आर्यन खानला पार्टीला बोलावलं होतं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. समीर वानखेडेशी त्याचे चांगले संबंध असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. आर्यन खान क्रुझ पार्टीवर स्वत: गेला नाही. त्याला बोलावलं गेलं. प्रतिक गाभा आणि ऋषभ सचदेवने त्याला पार्टीला बोलावलं होतं. हे किडनॅपिंगचं प्रकरण होतं. कंबोजच्या साल्यामार्फत हा खेळ खेळला गेला. किडनॅपिंगचा मास्टर माइंड दुसरा तिसरा कुणी नसून मोहीत कंबोज आहे. तो खंडणीवसूल करतो. तो १२ हॉटेल चालवतो असा दावा मलिक यांनी केला. समीर वानखेडे आणि कंबोजचं चांगले संबंध आहेत. त्यांचे व्हिडीओ लवकरच जारी करणार होतो. ७ तारखेला वानखेडे आणि कंबोज ओशिवरा स्मशानभूमी जवळ भेटले होते. तिथल्या लोकांनी मला सांगितलं. मात्र, त्यांचं नशीब चांगलं होतं की पोलीसांचं सीसीटीव्ही बंद होतं. त्यामुळे व्हिडीओ मिळाला नाही. त्यानंतर वानखेडे घाबरून गेले आणि त्यांनी कोणी तरी पाठलाग करत असल्याची तक्रार केली. ड्रग्जचा धंदा सुरू राहावा हेच वानखेडेंना वाटतं. बॉलिवूडमध्ये कोण ड्रग्ज घेतं याची माहिती घेऊन वानखेडेंनी दहशत निर्माण केली, असं मलिक यांनी सांगितलं.
९ तारखेला मी एक पीसी घेतली होती. त्यावेळी एक व्हिडीओ दाखवला होता. त्यात वानखेडे ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचं सांगत असल्याचं दिसत होतं. त्यावर ८ की १० लोकांना ताब्यात घेतलं? एक अधिकारी नेमका आकडा का सांगत नाही? असा सवाल मी केला होता. त्यानंतर मी पत्रकार परिषद घेऊन ८ नव्हे तर ११ लोकांना अटक झाल्याचं सांगितलं. अमीन फर्निचरवाला, प्रतिक गाभा, ऋषभ सचदेवांना घेऊन जात असल्याचा व्हिडीओ आम्ही दाखवला. या तिघांचे कुटुंबीय त्यांना एनसीबी कार्यालयातून घेऊन जात असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. मोहीत कंबोज यांचे साले असल्यानेच त्यांना सोडण्याचं आम्ही सांगितलं. त्यानंतर वानखेडेने पीसी घेऊन १४ लोकांना अटक केल्याचं सांगितलं. पण या १४ लोकांचं नाव सांगितलं नाही. पण या तिघांना सोडण्यात आलं हाच मोठा खेळ आहे, असंही ते म्हणाले.