नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळाच्या (सेबी) प्रमुख माधवी बूच यांचा राजीनामा आणि अदानीप्रकरणी चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) नेमण्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून येत्या २२ ऑगस्टला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात केला आहे, असा आरोपही प्रमुख विरोधी पक्षाने केला.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाचे सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांची मंगळवारी एक बैठक बोलावली होती. पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी निर्णयांची माहिती दिली. या बैठकीत ५६ नेते सहभागी झाले होते. त्यांपैकी ३८ जणांनी बहुमूल्य सल्ले दिले. आम्ही अदानी आणि सेबीशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली. आम्ही २२ ऑगस्टला देशव्यापी आंदोलन करणार आहोत. हे आंदोलन प्रामुख्याने दोन मागण्यांसाठी असेल. पहिली मागणी म्हणजे सेबी प्रमुखांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, तर अदानी महाघोटाळ्याच्या चौकशीसाठी जेपीसी नेमण्यात यावी, ही आमची दुसरी मागणी आहे, असे वेणुगोपाल म्हणाले.
बैठकीत जातनिहाय जनगणनेच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. सरकारने लवकरात लवकर जातनिहाय जनगणना केली पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर गरीब व मध्यमवर्गीयांच्या विश्वासघाताचा आरोप केला. तसेच प्रमुख मुद्दे पक्षाकडून जनतेत जाऊन मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले. सेबी व अदानीत साटेलोटे असल्याने सविस्तर चौकशीची गरज आहे. शेअर बाजारातील छोट्या गुंतवणूकदारांचा पैसा संकटात टाकता येऊ शकत नाही. मोदी सरकारने सेबी प्रमुखांचा तत्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि याप्रकरणी जेपीसी नेमली पाहिजे, असे खरगे म्हणाले. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीवरही चर्चा करण्यात आली.