भुसावळ (27 जुलै 2025) ः उत्तर महाराष्ट्रातील ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीदवाक्य घेवून कार्यरत ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ या वेब न्यूज पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवार, 2 ऑगस्ट 2025 रोजी शेकडो वाचक व भुसावळसह जिल्ह्यातील लाडक्या लोकप्रतिनिधी व प्रमुख शासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. वर्धापनदिनानिमित्त यंदापासून ‘नवरत्नांचा सन्मान’ व ‘विशेष सेवा गौरव’ तसेच ‘भुसावळ भूषण गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.
‘यांना जाहीर झाला नवरत्न समर्पण सेवा गौरव पुरस्कार 2025’
भुसावळ शहरातील विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे आपले कार्य करणार्या नवरत्नांची नवरत्न समर्पण सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात आरोग्य- प्रवीण फालक, सामाजिक- सोनू मांडे, वैद्यकीय- डॉ.सांतनूकुमार साहू, महिला सबलीकरण- रजनी सावकारे, नाट्य (सांस्कृतिक) प्रेरणा देशमुख, भाषा अभ्यासक- प्र.ह.दलाल, महिला समुपदेशन- भारती रंधे-म्हस्के, शैक्षणिक- प्राचार्य अनघा पाटील, सांस्कृतिक- गणेश फेगडे यांचा समावेश आहे.
‘विशेष सेवा गौरव सन्मान’
भुसावळ शहर व विभागाची धूरा सांभाळताना अल्पावधीत आपल्या कार्याने सर्वांना आपलेसे करून सोडणार्या व शहरवासीयांच्या गळ्यातील ताईत ठरलेल्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षक व आता श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच तत्कालीन उपअधीक्षक व आता पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपायुक्त असलेल्या कृष्णात पिंगळे यांचा विशेष सेवा गौरव सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.
‘भुसावळ भूषण पुरस्कार’
भुसावळसारख्या कॉस्मोपॉलिटीन शहरातील एम.आय.तेली इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी नूर फातेमा मणियारचा निबंध लेखन स्पर्धेत राज्यातून प्रथम आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी अलीकडेच सन्मान केला. या विद्यार्थिनीच्या कार्याची दखल घेत तसेच बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटींगमध्ये गोल्ड मेडल पटकावणार्या तीर्थराज मंगेश पाटील (भुसावळ) व बालभारती अभ्यास मंडळावर निवड झालेल्या तसेच राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.जगदीश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते भुसावळ भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
या मान्यवरांची ‘वर्धापनदिन विशेषांक’ प्रकाशनासाठी उपस्थिती
या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह अमळनेरच्या खासदार स्मिताताई वाघ, जळगावचे आमदार राजूमामा भोळे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेरचे आमदार अमोल जावळे, भुसावळातील ताप्ती एज्यु.सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, ताप्तीचे चेअरमन महेश फालक, भारतीय महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकीताई पाटील, भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, जळगाव लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील, सक्षम कौन्सीलिंग सेंटरच्या मॅनेजिंग डायरेक्टर आरती चौधरी यांच्यासह जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मंडल सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी आदींची उपस्थिती राहणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यास खान्देशातील वाचकप्रेमींनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन संपादक अमोल देवरे व कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी केले आहे.