धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात ‘युवक जोडो’ अभियानानिमित्त बैठक आयोजित करण्यात आली. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना यावेळी पक्ष श्रेष्ठींनी केल्या. याप्रसंगी इंधन दरवाढीसह राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यावरील ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ आज धरणगावात राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कार्यालय ते तहसील कार्यालय पर्यंत मोटार सायकलला धक्का देत व सिलेंडर लोटगाडी वर नेत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करीत मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई, पेट्रोल, डीझेल, खाद्यतेल गैस दरवाढ कमी करण्यात यावी या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी कार्यकर्त्यांनी ‘मोदि सरकारचा निषेध असो, या सरकारचे करायचे काय ? खाली डोकं वर पाय, मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद, पेट्रोल, डीझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे, वाह रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल’ अश्या घोषणा देत केंद्र सरकारच्या निषेध करीत परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवी पाटील, उपजिल्हाध्यक्ष दीपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, तालुकाध्यक्ष धनराज माळी, अरविंद मानकरी, अरविंद देवरे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, संभाजी धनगर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.