धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या परिस्थिती महिलांची प्रसूती बंद आहे. यामुळे तालुक्यातील गरीब महिलांची मोठी गैरसोय होत असून प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ येत आहे. प्रशासनाने गरीब, गरजू व आदिवासी महिलांची होणारी होरपळ तात्काळ थांबवून ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीची परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे युवानेते चंदन पाटील यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढवलेले आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये शहरातील व खेड्यापाड्यातील आणि आदिवासी भागातील गोरगरीब महिलांना प्रसूतीसाठी खाजगी रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. खाजगी रुग्णालयातील प्रसूतीची दर जास्त असल्याने गरीब महिलांना तेथे उपचार घेणे शक्य होत नाही. ज्यावेळी रात्री, अपरात्री गावातील व गावखेड्यातून आर्थिक गरीबीची परिस्थिती असलेल्या महिला भगिनी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी येतात. त्यांना मात्र, या ठिकाणी उपचार मिळत नाही. त्यामुळं लवकरात लवकर नियमित रुग्ण सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
याबाबत आज सकाळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्याधिकारी यांच्याशी भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, विकास लांबोळे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.