जळगाव (प्रतिनिधी) विकासात्मक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा मंडळांना पुरस्कार देण्याची योजना भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत आहे. नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे यावर्षी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय संचालित नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी युवा परिवर्तनाचे उत्तेजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येत असते. पुरस्काराचे स्वरूप जिल्हास्तरावर २५ हजार, राज्य स्तरावर ७५ हजार तर राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे ३ लाख, २ लाख आणि ५० हजार व प्रमाणपत्र असे आहे. विविध विषयांवर कार्य करणाऱ्या आणि नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवा मंडळांनी या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत असून अर्जाचा नमुना नेहरू युवा केंद्र जळगाव जिल्हा कार्यालय, जय हिंद कॉलनी, द्रौपदी नगर येथे विनामूल्य उपलब्ध आहे.