जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेतील भाजपचे २७ नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजाविली आहे. अपात्र करण्यात का येऊ नयेत ?, अशा आशयाची नोटीस २४ नगरसेवकांना बजविल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधीत नगरसेवकांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. यात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी भाजपतील फुटीर गटाचे नेते कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली. दरम्यान, आपल्या गटाकडे सर्वाधीक ३० नगरसेवक असून पक्षाचे सभागृहातील गटनेता हे दिलीप पोकळे असतील असे पत्र देखील या गटातर्फे देण्यात आले.
मध्यंतरी झालेल्या प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपच्या सर्व सदस्यांसाठी व्हीप बजावला होता. भाजपच्या २७ नगरसेवकांनी याचे उल्लंघन केले. यामुळे दिलीप पोकळे आणि कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या व्हिपचे उल्लंघन केले असल्याने त्यांना अपात्र करावे अशा मागणीचा अर्ज केला होता.
या अर्जावर निर्णय देतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावून त्यांना अपात्र का करण्यात येऊ नये ? अशी विचारणा केली आहे. आज ही नोटीस बजावण्यात आली असून यावर संबंधीत नगरसेवकांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.