गडचिरोली (वृत्तसंस्था) उप पोलीस स्टेशन पेरमिलीचे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांची गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्याने अमरावती परिक्षेत्रात नुकतीच बदली झाली होती. यानिमित्ताने तक्षशिला बुद्ध विहार व पेरमिली नागरिकांच्यावतीने नुकताच त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेरमिलीवासियातर्फे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात नोकरी करत असताना पेरमिली परिसरातील प्रत्येक नागरिकांशी ते जोडले गेले. पोलीस आणि जनता यांचे संबंधात जवळिकता निर्माण केली. या समारंभात बोलताना अनेकजण भावूक झाले. २०१८ पासून आतापर्यंत त्यांनी विविध योजना येथील गरीब जनतेकरिता राबविल्या. गडचिरोली सा. पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक समिर शेख, सोमय मुंढे, अनुज तारे व अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली “दादलोरा खिडकीच्या” माध्यमातून अनेक शिबिरे मेळावे आयोजित करून शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळेच लोकांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीचा जिव्हाळा निर्माण झाला. कोणतीही समस्या इथला माणूस त्यांच्याजवळ हक्काने मांडू लागला आणि ती समस्या सोडविण्याकरिता ते पाठपुरावा करून समस्या सोडवल्याशिवाय स्वस्थ बसत नव्हते असा अनेकदा अनुभव आला.
पेरमिली पासून दुर्गम भागात असलेल्या गावांत विज रस्ते मोबाईल नेटवर्क पोहचले पाहिजे याकरीता सातत्याने ग्रामस्थांच्या मिटिंग घेवून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. शासकीय योजना आणि शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी नागरिकांना अहिरे आलापल्लीला जावे लागत असत. येथील गरीब जनतेचा वेळ आणि पैसा वाचावा याकरिता पोलीस स्टेशन पेरमिली येथेच मेळावा आयोजन करून करून आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, लायसन्स, संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री सोलर पंप योजना, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, राशन कार्ड, शेतकऱ्यानंकरता कृषीसमृद्धी योजना अंतर्गत शेवगा लागवड मोफत बियाणे, मत्स्यपालन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विहिरी मंजूर करून दिल्या. महिलांचे जीवनमान उंचावणे म्हणून महिला मेळाव्याचे आयोजन करून त्यांना कुक्कुटपालन व इतर उद्योग करण्याचे आवाहन केले. त्यातूनच आलदंडी चंद्रा चंद्राटोला येथे आज मोठ्या प्रमाणात कुकूटपालन बचत गटामार्फत केले जात आहे. अनेक मुलींनी नर्सिंग, ब्युटी पार्लर सारखे कोर्सेस करून पोलिस दलाच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळवला.
गडचिरोली पोलीस दलाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांसाठी अनेक कोर्सेस उपलब्ध करून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. पेरमिली येथे वाचनालय व अभ्यासिका सुरु केली. माणुसकीची भिंत बांधून त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला. आपल्या स्वतःच्या मुलीचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करून ही रक्कम एका नक्षल पीडित कुटुंबाला देवून खाकी वर्दीतील देव माणसाचं दर्शन घडवून दिले. तसेच अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला. अशा बहुआयामी पोलिस अधिकार्याच्या निरोप समारंभाच्या वेळी येथील लोक खूपच भावुक झाले. पोलिसांच्या जवळ जायला नागरिक भित होते. तिथे आज नागरिक पोलिसांचा त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केला. हे संवेदनशील भागाचं बदलते चित्र आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम, सत्कारमूर्ती संध्या सपकाळे पीएसआय धनंजय पाटील, पीएसआय धवल देशमुख, डॉ. दुर्गे, आसिफ पठाण, श्रीनिवास बंडमवार, डॉ. मडावी, मेश्राम, श्रीकांत बंडमवार, राज बोमणवार, उपस्थित होते. महिलांची उपस्थिती प्रेक्षणिय होती. कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला बुद्ध विहाराचे सर्व सदस्य शंकर कुंभारे, श्रीकांत दुर्गे यांनी केले व सुत्रसंचलन साबळे व आभार श्रीकांत दुर्गे यांनी केले.