जळगाव (प्रतिनिधी) ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून महिलेसह तिचा पती, सासू, नणंद यांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम स्वीकारत तब्बल १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपयांमध्ये सोनल भिमराव उपलवार (वय-३४, रा. हरेश्वर नगर, जळगाव) यांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना गुरूवार २८ मार्च रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री ९.३० वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावातील हरेश्वर नगरमधील रहिवासी असलेल्या सोनल उपलवार यांचा व्हाटस अॅप क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीन जणांनी व्हाटस अॅपद्वारे मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. १६ फेब्रुवारी ते २८ मार्च या दरम्यान सोनल यांच्यासह त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील बँक खात्यातून वेळोवेळी एकूण १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपये स्वीकारले. तीन जणांनी मेसेज करत कोटींमध्ये रक्कम स्वीकारून फसवणूक तर केलीच शिवाय पैसे न भरल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देण्यात आल्यात.
गुंतवणुकीतून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनल यांनी गुरूवार २८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यावरून मेसेज करणाऱ्या तिघांसह व्हाटसअॅप ग्रुपचा अॅडमीन अशा चार जणांविरुद्ध जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय पाटील करीत आहेत.