पाचोरा (प्रतिनिधी) लग्नसोहळ्याचा कार्यक्रम सुरु असताना मी थोड्यावेळात परत येते असे, नवऱ्याला सांगून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मुलासह मृतदेह विहिरीत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, विवाहितेने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना तालुक्यातील लासगाव येथे घडलीय. लजिनाबी आरिफ शेख (वय १९. रा. लासगाव ता. पाचोरा) असे मयत महिलेचे तर असद आरिफ शेख (वय ५ महिने) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.
लासगाव येथील आरिफ शेख यांचा विवाह गावातीलच मामाची मुलगी लजिनाबी हिच्याशी झाला होता. लग्नानंतर या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त होऊन त्याचे नाव असद ठेवले होते. दरम्यान २८ मे रोजी गावात आरिफ शेख हे परिवारासह नातेवाईकाच्या लग्नात गेले. लग्नसोहळ्याचा कार्यक्रम सुरु असताना लजीनाबी यांनी पती आरिफ यांना मी थोड्यावेळात परत येते असे सांगितले. व लग्न सोहळ्यातून मुलगा असद याला सोबत घेत निघून गेल्या.मात्र बराच वेळ होऊनही लजिनाबी ह्या लग्न स्थळी परत आल्या नाहीत. त्यामुळे पती आरिफ शेख यांनी तात्काळ घर गाठले. परंतू तेथेही लजिनाबी व असद हे घरी नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे त्यांनी सगळीकडे शोधा-शोध सुरु केला. शेवटी शोध न लागल्यामुळे पाचोरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार देण्यात आली.
दरम्यान दि. ३० मे रोजी लासगाव गावातील शेत शिवारातील विहीरीत कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांसह कामगारांना महिलेसह चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. त्यांची ओळख पटवली असता लजिनाबी व असद यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले, घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी, राहुल बेहरे, दिलीप वाघमोडे हे पथक व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून लजिनाबी यांनी चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामनेर बीटचे कॉन्स्टेबल करीत आहे.