अहमदाबाद (वृत्तसंस्था) गुजरातच्या पोरबंदर जिल्ह्यातील सागरी सीमेवर मासेमारी करणाऱ्या भारतीय बोटीवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात एका माच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानकडून ‘जलपरी’ नावाच्या बोटीवर गोळीबार केला. या गोळीबारात श्रीहरी नावाच्या एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समुद्री सीमेबाबत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या बोटींना भारताची हद्द कुठे संपते आणि पाकिस्तानची कुठे सुरू होते, याची नेमकी कल्पना येत नाही. आपल्या देशाच्या हद्दीत घुसखोरी झाल्याचा दावा करत पाकिस्तानकडून भारतीय बोटीवर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून रविवारी जलपरी नावाच्या भारतीय बोटीवर गोळ्या झाडण्यात आल्या. यात श्रीहरी नावाचा मासेमार ठार झाला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सागरी सीमेबाबत असलेल्या संभ्रमाचा फटका मासेमारांना बसत असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
दरम्यान, याच वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानननं त्यांच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली ११ भारतीय मासेमारांना अटक केली होती. त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातददेखील १७ मासेमारांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या नौकादेखील पाकिस्तानी नौदलानं जप्त केल्या होत्या. भारत आणि पाकिस्तानमधील असणारी अरबी समुद्रातील सीमा निश्चित नसल्यामुळे दोन्ही देशातील मासेमारांना अटक होत असते. भारताकडूनदेखील घुसखोरी करण्यात आलेल्या पाकिस्तानी नौकाचालकांवर कारवाई करण्यात येत असते.