धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी गावात २९ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील ५८ संशयित आरोपींना वर्षभरासाठी गावबंदी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
पाळधी गावात २९ मार्च रोजी गावातील एका धार्मिक स्थळाजवळून जळगावातून पायी दिंडी जात असताना वाद्य वाजविल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली होती. त्यात चार पोलिसांसह सहा जण जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत ५८ जणांना अटक केली होती. तर तर ३५ जण अजूनही फरार आहेत. गावात काही दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अपील केले होते. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे संशयितांनी औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ५८ आरोपींना जामीन दिला असला तरी अनेक अटी-शर्ती घालून दिल्या आहेत.
५८ संशयित आरोपींना वर्षभरासाठी पाळधी गावात गावबंदी करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने सर्व संशयित आरोपींचे ५० हजार रुपयांचे हमीपत्र भरून द्यावे. पाळधी व्यतिरिक्त इतर ज्या ठिकाणी संशयित राहतील, त्या ठिकाणाबाबतची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र संशयितांना भरावे लागणार आहे. प्रतिज्ञापत्र भरल्यानंतर, संशयित ज्या ठिकाणी राहणार असल्याचे नमूद करेल, त्याच ठिकाणी संशयिताला वर्षभरासाठी राहावे लागणार आहे. याबाबतचे वृत्त आज ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे.