गोंदिया (वृत्तसंस्था) पार्टी करताना झालेल्या वाद-विवादात मित्राला खूप दारू पाजून त्याचा खून करत मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोहात फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राकेश सुकचरण उईके (३८, रा. पिपरिया, ता. सालेकसा) असे मृतकाचे नाव आहे.
सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत पिपरिया येथील आरोपी प्रकाश चमरूलाल भौतिक (वय ४०), मृतक राकेश सुकचरण उईके (वय ३८) व गावातीलच अन्य दोन असे चार जण १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता गावालगतच्या जंगलात पार्टी करायला गेले. मद्यप्राशन करून त्यांनी मटण पार्टी केली. मृतक राकेश उईके याचा आरोपीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिघेही परत गावाकडे आले.
राकेशने अति प्रमाणात मद्यप्राशन केले असल्याने तो पार्टी करण्याच्या ठिकाणीच पडून होता. घराकडे माघारी आलेल्या आरोपीने परत जाऊन सालेकसा तालुक्याच्या गल्लाटोला येथील तिलक उपराडे यांच्या शेतात त्याचा गळा आवळून खून केला. २० ऑक्टोबर रोजी छोटी बाघनदी पात्रातील राणी डोहाच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला. यासंदर्भात मृतकची पत्नी बबीता राकेश उईके (३५, रा. पिपरिया ) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत तपास करीत आहेत.
दरम्यान, राकेश उईके याचा दोराने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह नष्ट व्हावा, माशांनी खावा, यासाठी त्याचा मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोहाच्या पाण्यात टाकण्यात आला. परंतु, त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तीन दिवसांनंतर मिळाल्यानंतर खळबळ उडाली. मृतदेह मिळाल्यानंतर हळूहळू गावात या घटनेची सत्यता पुढे आली. तर मयत आणि आरोपी हे दोघेही मित्र असल्याने त्यांच्यात खून होण्यासारखे काय घडलं?, या प्रश्नाचं उत्तर पोलिस तपासातूनच समोर येणार आहे.