जळगाव (प्रतिनिधी) अवैध वाळू उपचार करणाऱ्यांकडून तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी अभिषेक पाटील, राम इंगळे व भुषण सपकाळे हे हफ्ते वसुली करीत आहे. याबाबतची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ताच्याकडे अज्ञात व्यक्तीने केली होती. ती तक्रार गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मेलवर केली आहे.
माहित अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे एका व्यक्तीने तक्रार केली आहे. या तक्रारीत त्या व्यक्तीने म्हटले आहे की, शहरातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गिरणा नदीचे पात्र आहे. जळगाव तालुक्यातील दापोरापासुन ते कानळदा व नांद्रा असे गावात असलेल्या १० ते १२ नदीपात्रांवर सर्व वाळुमाफीया हे रात्रंदिवस वाळु भरून वाहतुक करीत असतात. काही महिन्यापुर्वी गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीमुळे तालुका पोलीस स्टेशनमधील पोलीसावर कारवाई झाली होती. मात्र आता पुन्हा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अभिषेक पाटील, राम इंगळे व भुषण सपकाळे यांची हफ्ते वसुली बऱ्याच महिन्यांपासून केली जात आहे. पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या हप्ते वसुलीमुळे अवैध वाळु वाहतुक करणारे वाळू माफीया यांची हिम्मत वाढत आहे. त्यामुळे ते आपल्या सारख्या सर्व सामान्य नागरीक व सरकारी नोकर यांचेवर हल्ला देखील करणेस घाबरत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हप्ते वसुलीची तक्रार !
गुप्ता यांच्याकडे आलेली तक्रार त्यांनी पोलीस प्रशासनासह, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेलवर दाखल केली आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या डंपरवाल्यांकडून पोलीस कर्मचारी आठ हजार तर ट्रॅक्टरवाल्यांकडून पाच हजार रुपयांच्या हप्त्याचे दर ठरलेले आहेत. त्यानुसार ते तिघे कर्मचारी हप्ता वसुली करीत आहे. दररोज सुमारे दोनशे ट्रॅक्टर आणि शंभर डंपर वाल्यांकडून हप्ता वसुल केल्याचा आरोप आहे.