धरणगाव (प्रतिनिधी) येथील पी. आर. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक तथा सुप्रसिद्ध साहित्यिक, व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी यांची १२ व्या जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे ही निवड करण्यात आल्याचे, मंडळाचे अध्यक्ष डी. डी. पाटील आणि सचिव गोरख सुर्यवंशी यांनी, एका पत्रान्वये कळविले आहे.
दिनांक २० फेब्रुवारी, रविवार रोजी एकलव्य माध्यमिक विद्यालय, जामनेर येथे हे संमेलन संपन्न होणार आहे. प्रा. चौधरींच्या निमित्ताने धरणगावकरांना जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाचा बहुमान प्रथमच भेटत आहे. यापुर्वी सुप्रसिद्ध जेष्ठ कवी अशोक कोतवाल आणि डॉ. सौ. चारुता गोखले यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे. प्रा. बी.एन.चौधरी हे गेल्या ३५ वर्षांपासून साहित्य क्षेत्रात कार्यरत असून कवी, कथालेखक, गझलकार, समिक्षक, व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणून ते खान्देशात सुपरीचित आहेत. त्यांचा बंधमुक्त हा कविता संग्रह तसेच उध्वस्त हा कथासंग्रह प्रसिद्ध असून त्यांनी खान्देशसह महाराष्ट्रातील दोनशेवर कवींच्या कवितेची समिक्षा तथा साहित्यिकांचे परीचयात्मक लेखन केले आहे. जिल्हा, राज्यस्तरीय साहित्य संमेलनांमधून त्यांनी परीसंवाद, कथाकथन तथा कवी संमेलनांचे अध्यक्षपद भुषविले आहे. जेष्ठ साहित्यिकांचा परीचय व्हावा आणि नवोदितांना व्यापक प्रसिध्दी मिळावी, यासाठी प्रा. चौधरी सातत्याने लेखन करीत आहेत.
संमेलनाचे स्वागताध्यक्षा म्हणून जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन असून उद्घाटक म्हणून डॉ. मिलिंद बागुल उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी, अशोकभाऊ जैन, डॉ. शिरीष पाटील, विजय पांढरे, संस्थाध्यक्ष डी. डी. पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात जिल्ह्यातील अनेक मान्यवर निमंत्रित साहित्यिक म्हणून सहभाग नोंदवणार आहेत.
जामनेर येथे संपन्न होणाऱ्या या एकदिवशिय साहित्य संमेलनात उद्घाटन सत्र, कथाकथन, कवी संमेलन आणि जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमधील विजेत्यांना साहित्यिक पुरस्कार वितरण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. संमेलनाचे सूत्रसंचलन प्रा. सुधीर साठे, गणेश राऊत, शंकर भामेरे आणि प्रतिभा चौधरी करणार आहेत. प्रा. चौधरी यांच्या या निवडीचे धरणगाव परीसरातील साहित्य, कला, शिक्षण आणि पत्रकारीतेचा क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.