यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा गावात एका तरुणाच्या दुचाकीवर असलेल्या रावणाच्या चित्रावरून दोन जोरदार राडा झाला. या प्रकरणी दोन्ही गटाकडून एकामेकांविरुद्ध फैजपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या फिर्यादी नुसार हिंगोणा (ता. यावल) या गावात अतुल गाजरे यांच्या टपरीजवळ चेतन वसंत तायडे (वय २१) हा तरुण मोटरसायकल घेऊन उभा होता. त्याच्या मोटारसायकलवर रावणाचे चित्र काढलेले होते. यावेळी तुषार शांताराम कोळी, शुभम अनिल मोरे, भूषण रवींद्र कोळी, शांताराम पंडित कोडी व रोहित शांताराम कोळी (सर्व रा. हिंगोणा) हे पाच जण आले आणि रावणाचे चित्र मोटारसायकलवर काढण्याच्या कारणावरून चेतन तायडे याला त्यांनी शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या फिर्यादीत म्हटलेय की, हिंगोणा गावात अतुल गाजरे यांच्या टपरीच्या जवळ तुषार शांताराम कोळी (वय २०) हा तरुण उभा होता. तेव्हा काही एक कारण नसताना त्याला आकाश तायडे, अनुराग तायडे, धीरज तायडे, पृथ्वीराज तायडे, पवन चौहान, चेतन वसंत तायडे (सर्व रा. हिंगोणा) या सहा जणांनी येऊन जबर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोहेकॉ देविदास सूरदास हे करीत आहे.