मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगरात (Muktainagar) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने टाकलेल्या पोस्टचा राग आल्याने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी चालून जात वाद घातला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणावरून रोहिणीताई खडसे (Rohinitai khadse)आक्रमक झाल्या आहेत. तर आ. चंद्रकांत पाटील (Mla Chandrakant Patil) यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.
पीडित महिलेचे पती राष्ट्रवादी काँगेसचे पदाधिकारी असून त्यांनी सोशल मिडियात (social media post) एक पोस्ट शेअर केली होती. पोस्ट शेअर केल्याचा राग आल्याने दि.२४ रोजी रात्री १०.२२ वाजता ईश्वर हटकर याने महिलेच्या पतीला फोन करून धमकीसारखा फोन केला. रात्री १०.३० वाजता ईश्वर हटकर हा घरासमोर येऊन मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करीत असल्याने महिला घराबाहेर आली असता ईश्वर हटकर याने त्यांचा हात धरत लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले. तसेच आम्ही आमदार चंद्रकांत पाटलांचे माणसे आहोत. आम्हाला त्यांनी पाठविले आहे. घराबाहेर १५-२० लोक जमलेले होते. त्याच वेळी शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील त्याठिकाणी आला आणि नाथाभाऊ यांना शिवीगाळ करून ई.डी.चे २ कोटी कुठे गेले असे म्हणू लागला. घराबाहेर मोठी गर्दी असल्याने पीडितेने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी अँड. रोहिणी खडसे यांना फोन केला. काही वेळाने त्यांच्यासह दोघे आल्याने सुनील पाटील आणि ईश्वर हटकर हे नरमले.
यातील पहिली फिर्याद एका महिलेने दिली असून यात शिवराज पाटील आणि अजय जैन (दोन्ही रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सात-आठ जणांनी त्या महिलेचा विनयभंग करून मुलीस ढकलून देऊन पतीला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानुसार मुक्ताईनगर पोलीस स्थानकात शिवराज पाटील, अजय जैन आणि इतर अज्ञात सात-आठ जणांच्या विरुद्ध भादंवि कलम ३५४, ३२३, ४५२, ५०४, ५०६, १४१, १४३, ४२७ आदींसह कलम ३७ (१) आणि (३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या महिलेनेही मुक्ताईनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे. यानुसार, ईश्वर हटकर (रा. खामखेडा, ता. मुक्ताईनगर) आणि सुनील पाटील (रा. मुक्ताईनगर) यांच्यासह सुमारे १४-१५ जणांच्या विरूध्द तक्रार देण्यात आली आहे. यात या सर्व जणांनी या महिलेचा विनयभंग केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. यासोबत संबंधीत महिला आणि तिच्या पतीला मारहाण करून धमकावण्यात आल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे. यानुसार ईश्वर हटकर, सुनील पाटील आणि अन्य १४-१५ जणांच्या विरुध्द भादंवि कलम ३५४, १४९, १४३, ५०४, ५०६, ५०७ आणि (३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राहूल खताळ, उपनिरिक्षक प्रदीप शेवाळे, पो. ना. अविनाश पाटील हे करत आहेत.
या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील शिवराज पाटील आणि अजय जैन हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून ते एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक आहेत. तर ईश्वर हटकर आणि सुनील पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारी असून ते आमदार चंद्रकांत पाटील यांचा कट्टर समर्थक आहेत.
मुजोरपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे : अँड.रोहिणी खडसे-खेवलकर
जिल्हा बँक संचालिका तथा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी अँड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बोदवड नगर पंचायत निवडणुकीच्या वेळी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अरेरावीची भाषा केली होती. जिल्हाध्यक्ष अँड.रविंद्र पाटील यांच्याविरुद्ध देखील अपशब्द वापरले होते. याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रारींचे निवेदन दिले आहे. काल घडलेल्या प्रकारामुळे लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेचे काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतू एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर यापुढे शांत बसणार नाही. मुजोरपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा उपोषणाला बसावे लागेल. यापुढे असेच सुरु राहिले तरं उद्या आम्ही महिला आमदाराला देखील चोप देण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशा इशारा अँड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दिला आहे.
माझ्या जीवाला धोका खडसेंकडून जीवाला धोका
मुक्ताईनगर पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर आज आमदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेतली. तसेच खडसे आणि त्यांची कन्या ऍड.रोहिणी खडसे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. यापूर्वी देखील असे प्रकार घडले आहेत. काल घडलेल्या प्रकारची एसआयटी चौकशी करण्यासंदर्भात पोलीस अधिक्षकांची भेट घेतली असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. (shiv sena vs ncp) (jalgaon news)