चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात पोलीस व अन्न औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 22 लाख 41 हजार 800 रूपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील छत्रपती दुध शितकरण केंद्रासमोर असलेल्या गोदामात ही कारवाई करण्यात आली.
चाळीसगाव शहरातील छत्रपती दुध शीतकरण केंद्रासमोरील एका गोदामात बेकायदेशीरित्या सुगंधित पानमसाला आणि गुटखा यांची साठवणूक केली असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळताच गुरूवार, 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने गोडावूनवर छापा टाकण्यात आलाा. या कारवाईत संशयित आरोपी दत्तु लालदास बैरागी (29, रा.सिंधी कॉलनी, इंदिरा गांधी सिंधी शाळेजवळ, चाळीसगाव) याला ताब्यात घेतले.
या कारवाईत केसरयुक्त विमल पान मसाल्याचे 16 पोते, सुगंधित तंबाखुचे एकुण 11 पोते, केसरयुक्त विमल पानमसाला मोठे पाकीटातील 25 पोते असा एकुण 22 लाख 41 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हा मुद्देमाल संशयित आरोपी हा विक्री करत होता. त्यानुसार संशयित आरोपी दत्तु लालदास बैरागी याच्या विरोधात चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गोदामात शालेय पोषण आहाराचे तांदुळ, तेल, मीठ, दाळ आढळल्याने त्याबाबत गटविकास अधिकार्यांना सूचित करण्यात आले.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त समाधान पवार (दक्षता), सह आयुक्त संजय नारागुडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, शरद पवार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार योगेश बेलदार, पंढरीनाथ पवार, विनोद भोई, दीपक पाटील, तुकाराम चव्हाण, निलेश पाटील, प्रवीण जाधव, विनोद खैरनार, नंदकिशोर महाजन, अमोल भोसले, शरद पाटील, मोहन सूर्यवंशी, गणेश कुंवर यांच्या पथकाने केली.