कोटद्वार (वृत्तसंस्था) उत्तराखंडच्या कोटद्वारमध्ये बनावट रेमडेसिविर बनवून विकणाऱ्या एका कारखान्यावर दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रान्चनं छापा मारत बनावट इंजेक्शन, पॅकिंग डब्बे आणि मशीन जप्त केल्या आहेत. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
कोरोना संक्रमणासारख्या कठीण प्रसंगी ही टोळी गरजूंना २५ हजार रुपयांना एक बनावट रेमडेसिविर इंजेक्शन विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बनावट रेमडेसिविर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आज दिल्ली पोलिसांनी केलाय.
गुप्तपणे मिळालेल्या माहितीनंतर, क्राईम ब्रान्च डीसीपी मोनिका भारद्वाज यांच्या टीमनं ही कारवाई केली. कोटद्वारच्या संबंधित कारखान्यावर छापा मारत पोलिसांनी इथून बनावट इंजेक्शन, पॅकिंग डब्बे आणि मशीन जप्त केल्या आहेत. तसंच पोलिसांनी आरोपींकडून रेमडेसिविरचे १९६ बनावट इंजेक्शन जप्त केले आहे. सोबतच इंजेक्शन पॅक करण्यासाठी वापरले जाणारे ३००० वायल्सही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी एक ट्विट करून नागरिकांनाही जागरूक करण्याचा प्रयत्न केलाय. या ट्विटमध्ये त्यांनी बनावट रेमडेसिविर कशा ओळखायच्या याची माहिती दिली आहे.