मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गणपती बाप्पांचे आगमन कमी पावसात झाले पण मात्र बाप्पांच्या निरोपासाठी राज्यात पाऊस दाखल होणार आहे. काही जिल्हे सोडता अनेक भागांत वादळी वारे, विजांसह पावसाने थैमान घातले आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी पाऊस हजेरी लावत आहे. आजपासून (दि ७) राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान गणपती विसर्जनावेळी नागरिकांची तारांबळ उडण्यचाी शक्यता आहे.
विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारनंतर कोल्हापूर, पुणे, सांगली जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जना, विजांसह पावसाने हजेरी लावली. आज (ता. ७) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहून, बगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील विजांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. या जिल्ह्यात पावसाचा जोर असणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेडमध्ये पावसाची शक्यता आहे. विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे.
मागच्या 24 तासांत कुलाबा 50, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी प्रत्येकी 40, खालापूर, डहाणू प्रत्येकी 30. पंढरपूर 50, कागल, आजरा 40 प्रत्येकी, शेगाव 30. हिंगोली 60, अंबड, मानवत प्रत्येकी 50, पैठण, मंथा, लातूर प्रत्येकी 40, पाथरी, वसमत, शिरूर, अनंतपाळ, गंगापूर, उदगीर, सेलू, परळी वैजनाथ, चाकूर प्रत्येकी 30. तुमसर, हिंगणघाट, चांदूर रेल्वे, दिग्रस प्रत्येकी 40, काटोल, कळंब, चंद्रपूर, सावळी, नरखेडा, महागाव, सडक अर्जुनी, वर्धा, देवरी, बाभूळगाव प्रत्येकी 30 मिमी पावसाची नोंद झाली.
बारामती परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस
बारामती तालुक्यातील पश्चिम भागामध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस पडला आहे. अनेक गावांमध्ये ओढय़ा नाल्यांना पूर आलाय नीरा बारामती रस्त्यावरील अनेक पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेली असून वाहतूक ठप्प झाली आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. दरम्यान नीरा बारामती रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला तेथील स्थानिक युवकांनी ट्रॅक्टरवर दोरीच्या साहाय्याने वाचवले आहे.