नाशिक (प्रतिनिधी) देवदर्शनाच्या बहाण्याने दुचाकीवर घेवून जात एकाने गुंगीचे औषध देवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना त्र्यंबकेश्वर मार्गावर घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास बेड्या ठोकल्या आहेत.
रोहित आनंद म्हसदे (वय २५ रा.मायको दवाखान्याजवळ, फुलेनगर) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. पंचवटी परिसरात राहणा-या अल्पवयीन मुलीने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयीत आणि मुलगी एका ठिकाणी काम करतात त्यातून दोघांची ओळख झाली होती. रविवारी (दि.१८) सुट्टी असल्याने संशयीताने देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे जाण्याचा बहाणा केला. सकाळच्या सुमारास पेठरोडवरील उन्नती शाळा येथून मुलगी त्याच्या सोबत दुचाकीवर गेली होती. त्र्यंबकेश्वर पासून काही अंतरावरील एका हॉटेलमध्ये घेवून जात संशयीताने हे कृत्य केले. कोको कोलाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून संशयीताने हॉटेलमध्ये बळजबरीने बलात्कार केला. ही बाब लक्षात येताच पीडितेने पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असून पोलीसांनी संशयीतास अटक केली आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
















