जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात लसीकरणाबाबत शनिवारचा दिवस उल्लेखनीय ठरला आहे. एकाच दिवशी ४९ हजार ३० जणांनी कोरोना लस घेतली. आतापर्यंत सर्वांत जास्त लसीकरण करण्याची विक्रमी संख्या असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात विभागस्तरावरून अत्यंत मोजक्याच प्रमाणात लशींचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. परंतु, जिल्ह्यात ४४ हजार ४० कोव्हिशील्ड, तर पाच हजार ६८० कोव्हॅक्सिन अशी मात्रा उपलब्ध झाल्यानंतर शनिवारी एका दिवसात तब्बल ४९ हजार ३० जणांचे लसीकरण झाले. तालुकास्तरावर १३ हजार १०५, तर ग्रामीण भागात ३५ हजार ९२५ नागरिकांचे लसीकरण झाले.
शनिवारी ग्रामीण भागात २४ हजार ७११ नागरिकांना पहिला, तर आठ हजार ७३२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला, तर शहरी भागात चार हजार ७३३ नागरिकांना पहिला, तर ११ हजार २१४ नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले.