मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील २५ जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली असून यात जळगावचाही समावेश आहे. तसेच ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज कोविड टास्कफोर्ससोबत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला मंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याच्या मागणी संदर्भात सविस्तर माहिती दिली.
राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात २५ जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
या जिल्ह्यात होणार निर्बंध शिथिल
मराठवाडा : परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, विदर्भ : अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली, कोकण : रायगड, ठाणे, मुबई, उत्तर महाराष्ट्र : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार आहे.
राज्यातील ११ जिल्हे अजूनही तिसऱ्याच टप्प्यात
राज्यातील अकरा जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
मुंबई लोकल अद्याप नाहीच
मुंबईची लोकल सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यासंदर्भात देखील बैठकीत चर्चा झाली. यात कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करू द्यावा का? मग त्यासाठीची यंत्रणा आणि तयारी रेल्वेची आहे का? याबाबत रेल्वेबोर्डाशी चर्चा करण्यात येईल. सध्यातरी लोकल संदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, असं राजेश टोपे म्हणाले.