जळगाव (प्रतिनिधी) शहरात ठिकठिकाणी स्पॉट निवडून तेथून काळ्या बाजारातील रेमडीसीवीर इंजेक्शन २५ हजार रुपयात विक्री करणार्या टोळीचा पोलिसांनी आज पर्दाफाश केला आहे. तर ११ संशयीतांना रात्री सहाय्यक पोलिस अधीक्षकांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज एक हजारांच्या संख्येत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे जिल्हयात कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. याचा फायदा घेवून काळ्याबाजारात रेमडीसीवरची इंजेक्शन विक्रीसाठी टोळी सक्रिय होती. रेमडीसीवीर इंजेक्शनची शासकीय किंमत १२०० रुपये असतांना तब्बल २५ हजार रुपयांत एक याप्रमाणे इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांसून पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाकडून याबाबत तपास सुरु होता. तपासात शहरात विविध ठिकाणाहून तरुण तब्बल २५ हजार रुपयांत विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानुसार पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी आज त्याच्या कार्यालयातील कर्मचार्यांसह क्यूआरटी पथकातील कर्मचार्यांचा फौजफाटा सोबत घेत शहरात डोमीनोझ पिझ्झा, रामानंदनगर परिसरात रेल्वे रुळालगत, भास्कर मार्केट यासह इतर ठिकाणांहून पाच तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही जणांची नावे समोर आली. यानंतर ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. शेवटी वृत्त हाती आले तेव्हा उशीरापर्यंंत पोलिसांची चौकशी सुरु होती. चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
















