जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काट्याफैल परिसरात राहणारे सेवानिवृत्त कर्नल अ.लतिफ अ.मजीद सालार (वय-८३) यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते माजी उपमहापौर करीम सालार यांचे मोठे बंधू होते तर अभिनेता वकार शेख यांचे वडील होते.
लतीफ सालार यांची अंत्ययात्रा सोमवार दि.१९ रोजी सकाळी १० वाजता काट्याफैल येथील त्यांचे लहान बंधू माजी उपमहापौर करीम सालार यांचे राहत्या घरून निघणार असून दफनविधी जळगाव येथील अजिंठा चौफुली रोड मुस्लीम कब्रस्थान येथे पार पडणार आहे. सेवानिवृत्त कर्नल अ.लतिफ यांनी मू.जे. महाविद्यालयातून M.A ची पदवी घेतली होती. १९६२ साली भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सेनामध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून सेवा बजावली होती. १९८९ मध्ये ते लेफ्टनंट कर्नल म्हणून सेवानिवृत्त झाले. पाकिस्तान विरुद्ध १९६५ व १९७१ या दोन्ही युद्धामध्ये मोलाची कामगिरी केली होती. शासनाकडून आणि विविध संस्थांकडून त्यांना विविध सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे व सहा भावांचा मोठा परिवार आहे.