मुक्ताईनगर (प्रतिनिधी) दैवी शक्ती असलेला शंख देण्याच्या बहाण्याने नांदेड येथील काही जणांना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे बोलावल्यानंतर खोलीत डांबून मारहाण करून साडेसात लाखांचा ऐवज लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बसवराज हनुमंतराव बिराजदार (40, गुरुजी चौक, सिद्धीविनायक नगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून संतोष अजाबराव पाटील (कुर्हा), गणेश उर्फ हकीम रफीक पवार (हलखेडा), मुक्तार भाई, रंजित पवार यांच्यासह 10 ते 12 संशयितांनी गुन्हा दाखल करण्यात आला.संशयितांनी या शंखामुळे पैसा येतो, आर्थिक भरभराट होते, अशी बतावणी केली होती. यामुळे प्रभावित झालेल्या बिराजदार यांनी शंख विकत घेण्याचा तयारी दर्शवली. यानंतर संशयितांनी शंख देण्याच्या बहाण्याने बसवराज बिराजदार यांच्यासह नांदेडच्या काही जणांना हलखेडा येथे बोलावले. त्यानंतर सर्वांना एक खोलीत डांबून ठेवले.
खोलीत डांबून ठेवलेल्या लोकांकडून संशयितांनी चारचाकी व खिशात असलेली रोख रक्कम ४ लाख ३८ हजाराची रोकड तसेच मोबाईल, दीड लाख रुपये किमतीचा सॅमसंग फोल्ड मोबाईल, तीन 3 अन्य मोबाईल, पंधरा हजार रुपये किंमतीचा लावा मोबाईल, 12 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल, एक लाख किमतीचा आयफोन मोबाईल, 30 हजार रुपये किंमतीचा वन प्लस मोबाईल, पंचवीस हजार रुपये किंमतीची पुष्कराज कंपनीची घड्याळ, आणि पाच ग्रॅम सोन्याची अंगठी,आधार पॅन आणि क्रेडिट कार्ड असे एकूण सात लाख अडोतीस हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. पोलिसात तक्रार दिल्यास व्हिडिओ शुटिंग व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दूनगहू करीत आहे.