धरणगाव (प्रतिनिधी) धावडा ते धरणगाव नवीन पाईप लाईनसाठी 44 कोटी रुपयांचा निधीला आज प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न करून हा निधी प्राप्त करून दिला आहे.
धरणगाव शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना अमृत 2.0 अंतर्गत प्रस्तावित केली होती. या प्रस्तावाला आज मंजुरी मिळाली आहे. शहराला नियमित आणि पुरेशा प्रमाणात वर्षाचे 365 दिवस पाणी पुरवठा व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा वितरण प्रणालीचे काम सुरू आहे. लवकरच शहराला नियमित पाणी पुरवठा होणार आहे. परंतु शहराचा पाण्याचा स्त्रोत तापी नदीवर धावडा येथून आहे. तेथील पाइप लाईन ही जुनी झाल्याने वारंवार लिकेज् होत असते. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा वारंवार खंडित होत असतो. तेथील विहिरीत गाळ साचल्याने पण पाणी पुरवठा खंडित होण्याचे एक कारण होते.
याच अडचणींवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्याचे निर्देश धरणगाव नगरपालिकेला दिले होते. त्यानुसार केंद्र शासनकडील अमृत 2.0 योजनेअंतर्गत धरणगाव शहरासाठी 44 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाच्या राज्य स्तरीय तांत्रिक समितीकडे सादरीकरण करण्यात आला होता. त्यास आज प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यामुळे आता वारंवार खंडित होणारा पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.