धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून कारवाईसाठी जप्त केलेला अवैध वाळूचा ट्रॅक्टर लंपास झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कारवाई करून जप्त करण्यात आलेली वाहने धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेली असतात. दि. २ ऑक्टोबर सायंकाळी सहा ते दि. ३ ऑक्टोबरच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान स्वराज कंपनीचे लाल ट्रॅक्टर तसेच अन्य एका ट्रॅक्टरचे पुढील दोन चाके असा ३ लाख ४० हजार रुपये किंमतीचा ऐवज संशयीत आरोपी राहुल रमेश धनगर आणि विक्की पाटील (दोन्ही रा. पाळधी बु// ता. धरणगाव) यांनी चोरुन नेले. एवढेच नव्हे तर सि.सि.टी.व्ही कॅमेरे व वायर तोडूनही नुकसान केले. या प्रकरणी तलाठी विनोद शिवदास पाटील यांच्या फिर्यादीवरून भादवि कलम ३७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहेत.