धरणगाव (प्रतिनिधी) आमदारकीपेक्षाही गावाचे सरपंचपद मिळविणे हे कठीण असते. अर्थात, हा काटेरी मुकुट असतो. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी प्रत्येकाला गावाचा अभिमान असावा, आणि विकासाचे व्हिजन असावे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील अनोरे येथे विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करतांना ते बोलत होते.
दरम्यान, अनोरे परिसरासाठी ५ केव्हीएचा ट्रान्सफार्मर, गावासाठी स्मशानभूमि, व्यायामशाळा आणि पाण्याची टाकी उभारण्यात येणार असल्याची घोषणादेखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील हे होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते आज अनोरे येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमीपुजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, सरपंच स्वप्नील महाजन, उपसरपंच रूपाली पाटील, अशोक महाजन, रमेश महाजन, मिलींद पाटील, मोतीआप्पा पाटील, डी.ओ. पाटील, पी.एम. पाटील, राजेंद्र महाजन, मोहन महाजन, दामूअण्णा पाटील, विलास महाजन, संजय चौधरी, प्रशांत देशमुख, ग्रामपंचायत सदस्या कल्पना कापडणे, मनीषा महाजन, अँड. शरद माळी, संजय चौधरी, हेमंत चौधरी, भानुदास पाटील यांच्यासह अनोरे – धानोरे, गारखेडा – बाभळे परिसरातील सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रारंभी ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून अनोरे येथील विकासकामांना प्रचंड प्रमाणात गती मिळाल्याने त्यांना ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि शाळा समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते साई बाबा मंदिर ते अनोरे रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण करणे (७५ लक्ष); पेव्हर ब्लॉक-(५ लक्ष) या कामांचे लोकार्पण करण्यात आले. तर शासकीय दराने जमीन खरेदी करून स्मशानभूमि उभारण्याच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले. तर याच कार्यक्रमात शासकीय भावाने स्मशानभूमिसाठी जागा दिल्याबद्दल प्रल्हाद चिंधू महाजन यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन यांनी केले. सरपंच स्वप्नील महाजन यांनी गावाच्या विकासासाठी ना. गुलाबराव पाटील यांनी भरभरून निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तर उर्वरित कामांसाठी सुध्दा निधी मिळावा यासाठी साकडे घातले. यासोबत गावाचे रशिवासीं अभियंता मिलींद पाटील आणि पी.एम. पाटील यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून अनोरे परिसराने आपल्याला भरभरून मतदान केले असून या ऋणातून उतराई होण्यासाठी गावाच्या विकासाला कुठेही कमतरता भासू देणार नाही. हे मुद्दल व्याजासकट परत करण्यात येणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. ते म्हणाले की, या परिसरात सिंचनाची सुविधा करण्यात आली असून रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. सेवा ही खरी श्रीमंती असून प्रत्येकाने वडाच्या झाड्याच्या पारंब्यांप्रमाणे जमिनीशी जुडलेले असावे असा सल्ला त्यांनी दिला. माझ्याकडे जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याची तहान भागविण्याचे काम दिले असून आपण ते चोखपणे बजावत असल्याचे पालकमंत्र्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक बळीराम महाजन यांनी केले. तर आभार सरपंच स्वप्नील महाजन यांनी मानले.