पुणे (वृत्तसंस्था) पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. सुपेसोबत शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन अनेकांना उत्तीर्ण करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तुकाराम सुपे याच्या घरातून ८८ लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. तर जाणून घ्या…याबाबत दाखल गुन्ह्याची संपूर्ण माहिती !
शिक्षक पात्रता परिक्षामध्ये जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक व आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे संगनमताने निकालात फेरफार संबंधी दाखल गुन्ह्याची माहिती
सायबर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे म्हाडा पेपर फुटी संदर्भात दाखल असलेल्या गुन्हयातील अटक आरोपी नामे जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख व त्याचे साथीदार एजंट नामे संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांचेकडे तपास चालू असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम नामदेव सुपे तसेच शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करीत असलेला अभिषेक सावरीकर यांचे मदतीने सन २०१९-२०२० मधील शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्ये त्यांनी परिक्षार्थी कडून पैसे स्विकारुन परिक्षेच्या निकालात फेरफार करुन त्यांना पात्र केले होते.
सायबर पोलिसांकडून कसून चौकशी
त्यानुसार सायबर पोलीसांनी काल दि. १६/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम नामदेव सुपे तसेच शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करीत असलेला अभिषेक सावरीकर यांना चौकशीकामी सायबर पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचेकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी सदरहू परीक्षा आयोजनाची जबाबदारी असलेल्या खाजगी कंत्राटी कंपनी जी. ए. सॉफ्टवेअर चा संचालक प्रितीश देशमुख याला हाताशी धरुन त्यांचेकडे संतोष हरकळ व अंकुश हरकळ (रा. सिंदखेडराजा, बुलढाणा) यासारख्या एजंटांचे मदतीने परिक्षेतील परिक्षार्थीची माहिती मिळवून त्या परिक्षार्थीना पात्र करण्याचे आमिष दाखवून त्यांचेकडून प्रत्येकी ५० हजार ते १ लाखापर्यंत रक्कमा स्विकारून सुमारे ४ कोटी २० लाख रुपये जमा करुन ते आपसात वाटून घेवून त्या विद्यार्थ्यांना परिक्षेत पात्र केले आहे. त्यामध्ये तुकाराम सुपे यास १.७० कोटी, प्रितीश देशमुख यास १.२५ कोटी तर अभिषेक सावरीकर यास १.२५ कोटी इतका गैरलाभ झाल्याचे त्यांनी चौकशीदरम्यान कबुल केले आहे. त्यामुळे सायबर पोलीसांनी त्यांचे या गैरव्यवहाराबाबत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना लेखी कळविले होते. त्यानुसार त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील सध्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे दत्तात्रय गोविंद जगताप यांना प्राधिकृत करुन या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात पाठविले होते.
परीक्षा निकालाचे प्रक्रियेदरम्यान फेरफार
त्यांची फिर्याद नोंदविली त्याचा सारांश असा की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे इयत्ता ५ वी व ८ वी शिक्षवृत्ती परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा, टाईपिंग व शॉर्ट हॅड परीक्षा, ईबीसी शिष्यवृत्ती परीक्षा, खात्याअंतर्गत सेवा परीक्षा, डि. एल.ई.डी. इत्यादी परीक्षांचे आयोजन खाजगी कंत्राटी कंपन्यामार्फत शिक्षण विभागाकडून केले जाते. त्यासाठी सन २०१९ मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परिक्षेच्या जाहिरातीनुसार दि. १९/०१/२०२० रोजी ही पात्रता परीक्षा जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीस कंत्राट दिलेले होते. त्या कंपनीवा महाराष्ट्रातील संचालक प्रितीश देशमुख याचेवर ही सर्व जबाबदारी होती. त्याचाच फायदा घेवून त्याने तत्कालीन अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तुकाराम नामदेव सुपे व शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यास विश्वासात घेवून वेगवेगळ्या एजंटाकडून ज्या परीक्षार्थीना या परीक्षेत पात्र करून हवे आहे त्यांचेकडून वरीलप्रमाणे पैसे स्विकारून परीक्षा निकालाचे प्रक्रिये दरम्यान फेरफार करून त्यांना पात्र केले आहे. सदरहू खाजगी कंपनीचे संचालक प्रितीश देशमुख याने ही परीक्षा प्रक्रिया राबविताना ओएमआर शिट स्कॅनिंग करताना परीक्षा परिषदेस माहित न देता परस्पर स्कॅनिंग करणे, त्या शिटस् स्कॅनिंग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज वेळोवेळी परीक्षा परिषदेस सादर करणे बंधनकारक असताना न करणे या सारख्या गंभीर चुका केल्याने त्यास फिर्यादी तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी नोटीसा काढून दंडाची शिफारस केली होती. तसेच त्या कंपनीस ब्लॅकलिस्टेड ही केले होते. परंतू तुकाराम सुपे यांनी त्यांना पुन्हा काळ्या यादीतून वगळले आहे. वगैरे मजकूराचे फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गु.र.नं ५६ / २०२१ भा.दंवि कलम ४०६ ४०९ ४२० ४६५४६७ ४६८३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) सह महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परिक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम (१९९० सुधारीत) कलम ७.८ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
तुकाराम सुपे याच्या घरातून ८८ लाख रुपयांची रोख जप्त
दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामदेव सुपे याचे घराची घरझडती घेतली असता त्याचे घरातून या परीक्षेच्या माध्यमातून गैरलाभाने प्राप्त संपत्ती पैकी ८८,४९,९८०/- रु रोख व या संपत्तीतून खरेदी केलेले ५ ग्रॅम सोन्याचे नाणे, ०५ तोळयाचे दागिने व ५.५०,०००/- रुची एफ डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याशिवाय त्याने त्याचे मित्रासही लाखो रुपये दिल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय या गुन्हयाचे तपासात यापुर्वी म्हाडा संबंधी गुन्हयात अटक आरोपीत नामे संतोष हरकळ याचेकडे त्याचे बुलढाणा येथील घरझडतीत सन २०१९ २०२० मधील वरील गुन्हयातील निकालात फेरफार केलेल्या परीक्षार्थींची यादीची माहिती असलेला लॅपटॉप पथकाने जप्त केलेला आहे. त्याचे परीक्षण बाकी आहे.
हे अधिकारी करताय तपास
सदर गुन्हयाचा तपास अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रविंद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर, मा. भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विजय पळसुले, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे व.पो. नि. डी. एस. हाके यांचे मार्गदर्शनाखाली पोनि कुमार घाडगे हे करीत आहेत. या गुन्हयातील तपासाचे कामगिरी मध्ये सायबर पोलीस ठाण्यातील पोनि मिनल पाटील, पोनि अंकुश चिंतामण, पोनि संगिता माळी, पोउनि डफळ, वाघमारे, पडवळ, गवारी, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नितिन चांदणे, नवनाथ जाधव, सचिन वाजे, अनिल पुंडलीक, मानसी मोरे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडील पोनि शिवले, खेडेकर व कोळी यांनी बहुमोल मदत केलेली आहे.