छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) विहिरीत एका वृद्धेचा मृतदेह गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. शशिकला दिनकर कुपटकर (६५, रा. एस.टी. कॉलनी, सिडको एन-२, छत्रपती संभाजीनगर) असे मयत वृद्धेचे नाव आहे. त्यांचा खून करून अज्ञात मारेकऱ्याने मृतदेह विहिरीत फेकल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. (१३) दुपारी उघडकीस आली.
शशिकला या गुरुवारी (दि. (१२) सायंकाळी हरिपाठासाठी घराबाहेर पडल्या. परंतू त्या घरी परत न आल्याने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. दरम्यान, चौका (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारातील इस्माईल पठाण हे त्यांच्या गट क्रमांक ११२ मधील शेतातील विहिरीवर शुक्रवारी (दि. १३) विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत गोणी तरंगताना दिसली. शिवाय विहिरीच्या काठावर रक्ताने माखलेला रुमालही दिसून आला. घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना मिळताक त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील गोणी बाहेर काढली. यानंतर मृतदेह एकात एक अशा तीन गोण्यांमध्ये फेकून दिल्याचे लक्षात आले. वृद्धेच्या गळ्यावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने तिचा खून करण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास सूत्रे फिरवत या वृद्धेची ओळख पटवली. या वृद्धेस रात्रीच्या वेळी विहिरीत आणून फेकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पुढील तपास सपोनि. संदीप राजपूत, पो.हे.कॉ. कैलास राठोड हे करत आहेत.