नशिराबाद (प्रतिनिधी) जळगाव खुर्द गाव परिसरातील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयापासून काही अंतरावर एका शेतामध्ये १६ एप्रिल रोजी सकाळी मानवी शरीराच्या काही भागाचे हाडे सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी २० दिवसानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ.उल्हास पाटील कृषी महाविदयालच्या २ ते ३ अंतरावर असलेल्या शेताकडे प्रा.धनंजय सतरकर, डॉ.पुनमचंद सपकाळे, नारायण पाथरवट सहज फिरावयास गेलेले होते. यावेळी त्यांना एका शेतात एक मानवी कवटी आणि काही हाडे दिसून आली होती. तसेच घटनास्थळी आधारकार्ड, मोबाईल व काही कपडे पडलेले मिळून आले होते. ही घटना त्यांनी नशिराबाद पोलिसांना कळवल्यानंतर लागलीच सहायक पोलिस निरीक्षक अनिम मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळूंखे, समाधान पाटील, शिवदास चौधरी यांनी घटनास्थळी जावून कवटी आणि हाडे व आधारकार्ड, मोबाईल, कपडे ताब्यात घेतले होते.
रामा उरॉव (रा.मोकार्या उरॉव, पोस्ट भौंरा, थाना भण्डारा, जि.लोहरदगा, झारखंड) असे नाव लिहिलेले होते. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास केला असता कामानिमित्त मित्रांसोबत ते गुजरात येथे निघाले होते. रामा हा आमच्यासोबत झारखंडहून गुजरातसाठी रेल्वेने निघाला होता. पण, दारू पिण्यासाठी तो भुसावळ येथे उतरला होता, त्यानंतर त्याची रेल्वे सुटली. त्यामुळे दारूच्या नशेत फिरतांना तो नशिराबाद पोहचला असावा आणि नंतर कडक उन्हामुळे रामाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज देखील नातेवाईकांनी वर्तविला. दरम्यान, मृत्यू झाल्यानंतर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले असावे, त्यामुळे शेतात हाड विखुरलेल्या अवस्थेत असल्याचा अंदाज वर्तविला आहे.