चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत वर्धमान भाऊ धाडीवाल यांनी आज त्यांच्या पत्नी जयश्रीताई धाडीवाल यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून समाजातील गरजू व निराधार विधवा महिलांना उदरनिर्वाह निर्माण व्हावा या उद्देशाने शिलाई मशीन भेट दिल्या.
या शिलाई मशीन स्वयंमदीप संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षीताई निकम यांनी सुचवलेल्या महिलांना देण्यात आले आहेत. जेणेकरून यातून या भगिनी आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला हातभार लावून आपल्या मुलाबाळांचे शिक्षण करू शकतील हा प्रामाणिक उद्देश यामागे त्यांचा होता. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांची होती. यावेळी समाजात असे कार्य करणाऱ्या व्यक्तींची गरज असून त्यातून अशा निराधार महिलांना मिळालेली मदत मोलाची आहे. अशा चांगल्या कार्यक्रमास मला उपस्थित राहायला मिळाले, याचा मला मनस्वी आनंद आहे, असे मत के. के. पाटील यांनी व्यक्त केले. स्वतः वैयक्तिक मदत देखील या भगिनींना पाटील यांनी केली.
मीनाताई निकम यांनी महिलांच्या अडचणी व त्यांच्या समोरील समस्या याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास महेंद्र जैन, नवनीत दायमा, विजय गवळी, गणेश गवळी, गौतम आरक, पत्रकार मुराद पटेल, अल्लाउद्दीन शेख, दिनेश घोरपडे व वर्धमान भाऊ मित्र मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप घोरपडे यांनी केले तर आभारजयश्री धाडीवाल यांनी मानले.