मुंबई (वृत्तसंस्था) आपल्याकडे सगळं काही आहे, मग हे सर्व करायची काय गरज होती?, अशा शब्दात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पती राज कुंद्रावर संताप व्यक्त केला. पोलीस चौकशीला घरी कुंद्रासोबत आल्यानंतर शिल्पाचे अश्रू थांबत नव्हते.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रामुळे सध्या चर्चेत आहे. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तपास करण्यासाठी मुंबई पोलीस राज कुंद्राच्या घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी राज कुंद्रालाही सोबत घेतले होते. अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्राला पाहून शिल्पा शेट्टीचा संताप अनावर झाला आणि पोलिसांसमोरच ती राज कुंद्रावर ओरडू लागली. आपल्याकडे सगळं काही आहे, मग हे सर्व करायची काय गरज होती, असे शिल्पा शेट्टी राज कुंद्राला विचारत होती. पोलिसांनी यावेळी संपूर्ण घराची पाहणी केली.पोलिसांनी यावेळी शिल्पा शेट्टीचा जबाबही नोंदवला. शिल्पा शेट्टी यावेळी खूप भावूक झाली होती. तू कुटुंबाची प्रतिष्ठा मलीन केली आहेस. इंडस्ट्रीतील काम हातून गेलं आहे. अनेक प्रोजेक्ट्स हातातून सोडावे लागले आहेत, अशा शब्दांत तिने राज कुंद्राला ऐकवले.आपल्याला खूप आर्थिक नुकसान सहन करावं लागत असल्याचेही यावेळी शिल्पा शेट्टीने म्हटले. पोलीस राज कुंद्राची कसून चौकशी करत असून कार्यालयासोबत त्याच्या घराचीही झडती घेतली गेली आहे. राज कुंद्राच्या विरोधात पोलिसांना अनेक पुरावे सापडले आहेत. याशिवाय त्याच्या घरी एक गुप्त कपाटही सापडल्याचे कळत आहे. दरम्यान राज कुंद्राला मंगळवारी न्यायालयात हजर केलं असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.