धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा येथील एका महिलेला मुंबई क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगत तुमच्याविरुद्ध ‘मनी लाँड्रिंग’चा गुन्हा दाखल असल्याची भीती दाखवत एका २४ वर्षीय महिलेला ६९ हजार ५४९ रुपयात गंडवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या नावाचं कुरिअर आल्याचा पहिला फोन !
तक्रारदार महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ मार्च रोजी रोजी दुपारी १२.१० मिनिटांनी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात इसमाचा मो.नं. ९१९६२४५७६३९ ह्यावरून फोन आला. त्यांनी तक्रारदार महिलेने सांगितले की, मी मुंबईहून कुरिअर सेंटर मधून बोलतोय, तुमच्या नावाचं कुरिअर आलेले आहे. त्यावर तक्रारदार महिलेने प्रश्न केला की, मी काहीएक मागविलेले नाही, त्यावर समोरच्या व्यक्तीने अंधेरीचा पत्ता सांगितला. त्यावर तक्रारदार महिलेने त्यांना सांगितले की, हा पत्ता माझा नाही. त्यावर त्यांनी पुन्हा महिलेने सांगितले की, तुमच्या नावाचा कोणीतरी व्यक्ती दुरुपयोग करीत आहे. मी तुम्हाला सायबर क्राईम ब्राँचला संपर्क करुन देतो, तुम्ही त्यांचे मार्गदर्शन घ्या.
मुंबई क्राईम ब्रांचमधून पोलीस बोलतोय…!
यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच दुपारी १२.२३ मिनिटांनी तक्रारदार महिलेच्या हॉट्सअँपवर ९१८७७०९०८३९७ या नंबरहून फोन आला. समोरून बोलत असलेल्या भामट्याने त्यांना सांगितले की, मी मुंबई येथील क्राईम ब्रांचमधून पोलीस बोलतोय. तुमचा नावाचा गैरउपयोग होतांना आम्हाला दिसतोय. फोन सुरु असतानाच त्यांनी तक्रारदार महिलेच्या हॉट्सअँपवर YRCX ANDHERI EAST CRIME BRANCH, mumbai@mahapolice.gov.in अश्या वर्णानाच्या मँसेज पाठविला.
मनिलाँडरिंगची केस झाल्याची दिली खोटी धमकी !
फोन सुरु असतांनाच त्यांनी संबंधित महिलेला आधारकार्ड पाठविण्यास सांगितले. आधारकार्ड पाठवल्यावर भामट्यांनी तुमचावर मनिलाँडरिंगची केस झालेली आहे. मोठ्या साहेबांना सांगावे लागेल. परंतू तुम्हाला आम्हाला सहकार्य करावे लागेल. असे बोलून त्यांनी पुन्हा व्हॉटसअॅपवर पोलीसांचे फोटो व अज्ञात आरोपी आहेत असे तीन आरोपी म्हणून महिलेला फोटो पाठविले. एवढेच नव्हे तर अज्ञात पासबुकचा फोटो व त्यासोबत गुन्हा केला आहे, अश्या आशयाचे पत्रही पाठविले. त्यावेळीही व्हॉटस अॅपवरुन कोणल चालूच होता.
व्हॉटस अॅपवर पाठवले गुन्हा दाखल असल्याचे खोटे पत्रे पाठवून उकलले पैसे !
दोघं पत्रे वाचले असता संबंधित महिलेविरुद्ध ९८,३२६ अश्या रक्कमेचा मनी लाँडरिंग केल्याबाबत नमुद केले होते. तसेच भादवि कलम १९३,२२८,१९८,२२३,४२० चा गुन्हा केल्याबाबतचे वर्णन दिलेले आढळुन आले. यानंतर भेदरलेल्या महिलेला भामट्यांनी धमकावले की, तुम्ही जर १५ मिनिटात आम्हाला ९८,३२६ रुपयांसाठी सहकार्य केले नाही तर, तुम्हाला ७ वर्षापर्यंत तुरुंगात रहावे लागेल. तुम्ही ताबडतोब आम्ही सांगतो त्याप्रमाणे जर सहकार्य केले तर, आम्ही तुमचाविरुध्द कारवाई थांबवू. त्यानंतर भामट्यांनी संबंधित महिलेकडे बॅलेन्स असल्याबाबतचे फोटो मागितले. फोटो पाठविल्याबरोबर त्यांनी लगेच सांगितले की, ९८,३२६ एवढे पैसे पाठवा. तक्रारदार महिलेने घाबरून ६९ हजार ५४९ रुपये पाठविले. पैसे पाठवताच भामट्यांनी लगेचच फोन बंद केला. त्यानंतर महिलेने पुन्हा फोन लावण्याच्या प्रयत्न केला असता कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही. दरम्यान, याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. प्रदीप पवार हे करीत आहेत.