अलिबाग (वृत्तसंस्था) अलिबागमध्ये फिरायला आलेल्या दाम्पत्यानं दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (Family ends life) घटना उघडकीस आली आहे. अलिबाग शहरातील एका कॉटेजमध्ये हे दाम्पत्य आणि त्यांची मुलं थांबली होती.
अलिबाग शहरातील एका कॉटेजमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह कॉटेजमध्ये आढळून आले. दोन मुलांना विष देऊन त्यांची हत्या केल्यानंतर आई-वडिलांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मागील आठवड्यातच हे कुटुंब कळंबोली येथून अलिबागमध्ये फिरायला आल्याची माहिती समजते. अलिबागमध्ये फिरायला आल्यानंतर हे कुटुंब येथील एका कॉटेजमध्ये थांबलं होतं. आज दुपारी दोन्ही मुलांसह चौघांचे मृतदेह आढळून आले. दोन मुलांना विष देऊन त्यांच्या हत्येनंतर दाम्पत्यानंही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे.
ज्या कॉटेजमध्ये हे कुटुंब थांबलं होतं, ते कुटुंब सकाळपासून बाहेर पडलेलं दिसलं नाही. कुटुंबापैकी कुणीच बाहेर न दिसल्यानं, तसंच कोणतीही हालचाल दिसून आली नाही. अखेर दुपारी तीन वाजताच्या सुमारास मालकानं दरवाजा उघडून आतमध्ये बघितलं असता, चौघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात नेले. या घटनेचा तपास सुरू आहे. मुलांची हत्या करून गळफास घेऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल या दाम्पत्यानं का उचललं, यामागचं कारण अद्याप समोर आलेले नाही.