अकोला (वृत्तसंस्था) सख्ख्या विवाहित बहिणीवर लहान बहिणीने रागाच्या भरात चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना खळबळजनक घटना बोरगाव मंजू जवळील खडका गावात रविवारी रात्री घडली. मोठी बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत लहान बहीण तिच्यावर चाकूने वार करीत होती. रेशमा अनंत बोरसे (वय २९) असे मृतक बहिणीचे तर रविना विठ्ठल वसतकार (वय २३) असे मारेकरी बहिणीचे नाव आहे. रविनाला क्राइम शो’ चा नाद होता. त्यामुळे तिच्या मनावर परिणाम झाला होता आणि त्यातूनच तिने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मानेवर आणि पोटावर वार !
खडका येथे विठ्ठल वसतकार हे कुटुंबासह राहतात. त्यांची मोठी विवाहित मुलगी रेश्मा ही बुलढाण्याला असते. लहानी रविना घरीच असते. गेल्या आठवड्यात रेश्मा माहेरी आली होती. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दोघी बहिणी बेडरूममध्ये बोलत असताना कोण्यातरी विषयावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी आईवडिल समोरच्या खोलीमध्ये बसले होते. परंतू दोघां बहिणींमध्ये वाद एवढा विकोपाला गेला की, संतापलेल्या रविनाने धारदार चाकूने रेश्माच्या मानेवर आणि पोटावर वार केले. रेशमाच्या आरडाओरड ऐकून आई-वडील येईपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
क्राइम शो पाहून केले कृत्य ?
स्थानिक वृत्तपत्राच्या वृत्तानुसार रविना टीव्हीवर क्राइम शो पाहायची. क्राइम एपिसोडमध्ये रक्तरंजित हत्या, हल्ले पाहून रविनाच्या मनावर परिणाम झाल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आल्याचे कळते. दोघी बहिणींमध्ये जिवापाड प्रेम होते. अधूनमधून त्या भांडायच्यासुद्धा; मात्र गेल्या काही महिन्यांपासून रविना मानसिक तणावात होती. तिच्यावर मनोरुग्ण रुग्णालयात उपचार सुरु असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, रविनाला पोलिसांनी ताब्यात घेत तिची सखोल चौकशी केली असता ती मनोरुग्ण असल्याचे लक्षात आले. तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार सुरू आहेत. मला पोलिस, झाशीची राणी बनायचे आहे, मी विजय मिळवला असेही ती बोलत असून बहिणीच्या मृत्यूचा कोणताही पश्चाताप तिला झाला नसल्याचे तिच्या वागण्यातून दिसून येत नाही. यावरून ती मनोरुग्ण आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिल्याचेही वृत्तात म्हटले आहे.