पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवडमध्ये एका आयटी इंजिनिअरने महिलेला मधले बोट दाखवल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आयटी इंजिनिअरची प्रचंड धुलाई केली आहे. या घटनेत इंजिनिअरच्या डोक्याला तब्बल १२ टाके पडले असून, हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात घडली आहे. याठिकाणी जखमी तरुण आपल्या वाहनानं प्रवास करत होता. दरम्यान त्यांच्या पाठीमागून आलेली एक महिला वारंवार हॉर्न वाजवत होती. महिलेच्या कर्कश आवाजाच्या हॉर्नला कंटाळून चिडलेल्या आयटी इंजिनिअरनं संबंधित महिलेला भरचौकात मधलं बोट दाखवलं.
हा सर्व प्रकार काही स्थानिक तरुणांनी पाहिला. त्यांनी इंजिनिअर तरुणाला जाब विचारत मारहाण करायला सुरुवात केली. नागरिकांच्या टोळक्यानं लाकडी दांड्याने इंजिनिअरला बेदम मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की इंजिनिअर रक्तबंबाळ झाला होता. या प्रकारानंतर आसपासच्या काही नागरिकांनी संबंधित इंजिनिअरला जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी इंजिनिअरवर उपचार सुरू असून त्याच्या डोक्याला तब्बल १२ टाके पडले आहेत. हाणामारीची सर्व घटना रस्त्यावरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.