मुंबई (वृत्तसंस्था) मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. या मुद्द्याला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा केली.
डेलकर यांच्या सुसाईड नोटचा उल्लेख अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. डेलकर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, कारण त्यांना महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल याची अपेक्षा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास आहे, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने पत्र लिहून प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
विधानसभेत बोलताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, “दादर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर हे सात वेळा खासदार होते. सात वेळा खासदार राहिलेला व्यक्ती आत्महत्या करतो. तेही मुंबईत येऊन. त्यांनी सुसाईड नोटमध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्यात त्यांनी दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांचं नाव घेतलेलं आहे. खेडा पटेल आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात होता. वारंवार अडचणी निर्माण केलं जात होत. सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या पटेल यांच्या माध्यमातून दिल्या जात होत्या, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहात दिली.
मोहन डेलकर कोण आहेत?
मोहन डेलकर याचं वय ५ वर्षांचे होतं. वर्ष १९८९ मध्ये ते दादरा आणि नगर लोकसभा क्षेत्रातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ट्रेड युनियन नेता म्हणून केली होती. ते काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय नवशक्ती पार्टी (बीएनपी) ची स्थापना केली होती.
मोहन डेलकर यांनी तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत ते निवडून आले होते. गेल्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मोहन डेलकर यांनी दादरा आणि नगर हवेली येथील स्थानिक निवडणुकांसाठी जेडीयूशी करार केला होता. जेडीयूला पाठिंबा दर्शविल्यामुळे दादरा आणि नगर हवेलीमधील स्थानिक मतदानात भारतीय जनता पक्षाला जागा गमवावी लागली होती.